सोलापूर : संस्था चालकाकडून लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना अखेर सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी २५ हजार रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडून अहवाल प्राप्त होताच तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग पुणे व संचालक शिक्षण विभाग पुणे या कार्यालयांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल पाठवला होता.
त्यानुसार राज्य शासनाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन आदेशानुसार किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (गट-अ), जि. प. सोलापूर यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे आणि पुढील आदेश होईपर्यंत ते निलंबित राहतील. त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर ठेवण्यात आले असून त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही, असेही निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जामीन मंजूर…
शिक्षणाधिकारी लोहार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी युक्तिवाद झाला आहे. आरोपी लोहार यांच्यातर्फे अँड मिलिंद थोबडे, विनोद सुरवंशी यांनी युक्तिवाद केला आहे. पोलीस तपास संपला आहे, त्यामुळे आता त्यांना जामीन द्यावा अशी मागणी केली. सरकारतर्फे आरोपी साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश आर एन पांढरे यांनी आरोपी लोहार यांना वीस हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.