राज्यात गुटखाबंदी उरली केवळ कागदावरच; खुलेआम होतेय गुटखा विक्री
मुंबई : महाराष्ट्रात खरोखर गुटखा विक्रीवर बंदी आहे का, असा प्रश्न पनवेल, उरण तालुक्यात खुलेआम सुरु असलेल्या गुटखा विक्रीमुळे विचारला जात आहे. पनवेल आणि उरण तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातल्या दुकानांनमध्येही सर्रासपणे गुटखा विक्री केली जात असूनही त्या विरोधात अन्न व औषधे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात जुलै २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू करण्यात आली. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. गुटख्यामुळे अनेकांना तोंडाचा कर्करोग होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांनी गुटख्यापासून दूर राहावे यासाठी शासनाकडून जनजागृती केली जात आहे. तरीही सर्रासपणे उरण, पनवेलमधील शहरी भागासह ग्रामीण भागातील टपऱ्या व दुकानांवरही सर्रास खुलेआम गुटखा विक्री जोरात सुरू आहे.
या ठिकाणी दुप्पट-तिप्पट वाढीव किमतीला गुटखा विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागापुढे गुटखा विक्री रोखणे आव्हान ठरत आहे. गुटखा विक्रेत्यांनी किराणा दुकान, पानपट्टी व शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात दुकाने थाटली असून, सर्रास गुटखा विक्री केली जात आहे. गुटखा खाऊन रस्ते, शासकीय कार्यालय, चौक, बस स्थानक, वर्दळीच्या ठिकाणी थुंकून परिसर अस्वच्छ केला जातो.
अन्न व औषध प्रशासन ठरतेय हतबल
अन्न व औषध प्रशासनाकडून गुटखा विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईपासून सामान्य विक्रेत्यांना गुटखा पुरवणारे मात्र लांबच आहेत. परजिल्ह्यातून गुटखा मागवून ते विक्रेत्यांना पुरवणारे कारवाईपासून बचावलेले आहेत. कारवाई फक्त सामान्य विक्रेत्यांवर केली जात असल्याने गुटखा वितरित करणाऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान अन्न व औषध प्रशासनावर आहे.
दुप्पट-तिप्पट आकारली जाते किंमत
टपऱ्या व दुकानदार गुटख्याची मागणी करताच गुटख्याची ५ रुपये किमतीची पुडी १० रुपयांना, तर काही कंपन्यांच्या गुटख्याची ७ रुपये किमतीची पुडी ३० रुपयांना विकत आहेत. इतर वेळेस घासाघीस करणारे ग्राहक गुटखा विकत घेताना मात्र कोणतीही तक्रार करताना दिसत नाहीत.
पोलिसांच्या कारवाईकडे लागले लक्ष
खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कोणतीही दहशत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांना या गुटखा विक्रीबाबत विचारले असता गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करणे आमचे काम नाही, ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे, असे सांगण्यात येते. पोलिसांच्या या भूमिकेमागे मोठे अर्थकारण असल्याचे सांगितले जाते.
परराज्यांतून पुरवठा
परराज्यांतून चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक सुरू आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश त्याचप्रमाणे गुजरातहून आणलेल्या गुटख्याची महामार्गालगतच्या गोदामात साठवणूक करून रात्रीच टपऱ्या व दुकानदारांना विकला जातो, तर ग्रामीण भागात विक्रेत्यांचा सहाय्याने पाठविला जातो.