Haryana Steelers win over Telugu Titans Team in Pro Kabaddi League 11
पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ करणाऱ्या हरियाणा स्टीलर्स संघाने तेलुगु टायटन्स संघाचा ४६-२५ असा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळविला.मध्यंतराला हरियाणा संघाने २८-९ अशी मोठी आघाडी घेतली होती. तेव्हाच त्यांचा विजय स्पष्ट झाला होता. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने येथील अगोदरच्या सामन्यात पाटणा पायरेट्स या बलाढ्य संघावर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना आजही त्याच कामगिरीची अपेक्षा होती अर्थात तेलुगु संघानेही या अगोदरच्या सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाला दोन गुणांनी हरविले होते. त्यांनाही आजचा सामना जिंकण्याची आशा होती.
प्रतिस्पर्धी तेलुगू टायटन्स संघाला फारशी संधी
हरियाणा स्टीलर्स संघाने सुरुवातीपासूनच जोरदार व पल्लेदार चढाया तसेच उत्कृष्ट पकडी याच्या जोरावर प्रतिस्पर्धी तेलुगू टायटन्स संघाला फारशी संधी दिली नाही. त्यांनी सुरुवातीपासून खेळावर वर्चस्व मिळविले होते ते त्यांनी मध्यंतरापर्यंत ठेवले होते. त्यांच्या बचाव फळीतील खेळाडूंनी साखळी पद्धतीने प्रतिस्पर्धी चढाईपटूला आपल्या जाळ्यात कसे ओढता येईल याचे बरोबर नियोजन केले होते आणि या नियोजनामध्ये तेलुगु संघाचे चढाईपटू बरोबर सापडले. तसेच हरियाणा संघाच्या विनय, राहुल, शिवम पठारे, मोहम्मद रेझा शादलुई या चढाई पटूंनी खोलवर चढाया करीत गुणांची वसुली केली. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण चढविला. त्यानंतर बराच वेळ तेलुगु संघाला गुण नोंदविण्यात यश मिळाले नाही मध्यंतरास तीन मिनिटे बाकी असताना त्यांना आणखी एक लोण स्वीकारावा लागला. मध्यंतरापर्यंत तरी तेलुगु संघाला दोन्ही आघाड्यांवर फारसा सूर गवसला नाही.
हरियाणा संघाच्या नियोजनबद्ध खेळामुळे त्यांच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट
उत्तरार्धात तेलुगु संघाच्या खेळाडूंनी पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र हरियाणा संघाच्या नियोजनबद्ध खेळामुळे त्यांच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना हरियाणा संघ ३४-१६ असा आघाडीवर होता. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना हरियाणा संघाने ४०-१७ अशी मोठी आघाडी मिळवली होती. हरियाणा संघाकडून शिवम पठारे याने बारा गुण तर विनयने सात गुण नोंदविले. तेलुगु संघाकडून आशिष नरवाल याने तेरा गुणांची नोंद केली.