Rain in Gadchiroli
सिरोंचा : अहेरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या कल्लेड ते झिंगानूरदरम्यान असलेल्या नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूची माती अतिवृष्टीने वाहून गेली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे कल्लेडचा सिरोंचा व अहेरी तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कल्लेड ते झिंगानूरदरम्यानच्या नाल्यावर दोन वर्षांपूर्वी पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, यावर्षीच्या अतिवृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूची माती वाहून गेल्याने कल्लेडचा सिरोंचा, अहेरी तालुका मुख्यालयासह जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. सदर पूल कल्लेड गावाला लागूनच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाची उंची व लांबी अत्यंत कमी ठेवल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असते.
पुलाच्या दोन्ही बाजूला गिट्टी व मुरूम न भरता केवळ माती भरल्याने यावर्षीच्या अतिवृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूची माती वाहून गेली आहे. त्यामुळे अवागमनाला अडथळा निर्माण झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूची माती वाहून गेल्याने कल्लेडसह झिंगानूर ते देचिलीपेठा-जिमलगट्टा वाहतूक बंद झाली आहे.
तसेच झिंगानूर ते रमेशगुडम नवीन रस्ता बांधकामासाठी माती खोदून रस्त्यावर टाकल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद आहे. झिंगानूर ते रोमपल्ली दरम्यानच्या नैगुंडा नाल्यावर पाणी असल्याने हा मार्गही बंद झाला आहे.