कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्र परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पंचगंगा नदीपात्रात प्रचंड वाढ झाली आहे. आज दुपारी दोन वाजता या नदीवरील सर्वाधिक मोठा राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते ,मात्र गेली महिनाभरापासून पावसाने पूर्णता हुलकावणी दिल्याने धरणातील पाणी कमी झाले होते. त्यामुळे नदीपात्रातही पाणी कमी होते, मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली होती मात्र जोर धरलेला नव्हता.
पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली
कालपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली असून, पावसाने हळूहळू जोर धरला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागल्याने कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. या नदीवर असंख्य बंधारे असून पाणी पातळी वाढल्यास ही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने पाटबंधारे विभागाने योग्य काळजी घेतली नसल्याने शिंगणापूर येथील बंधाऱ्याची बर्गे न निघाल्याने या बंधाऱ्यावर दाब पडू लागला आहे.
शिंगणापूर बंधाऱ्यांचे बरगे काढले
पाटबंधारे विभागाने अजूनही शिंगणापूर बंधाऱ्यांचे बरगे काढले नसल्याने बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. याची कल्पना जिल्हा आपती व्यवस्थापन विभागालाही नसल्याचं दिसून येत आहे. १९९४ साली युती सरकारच्या काळात कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ४३ कोटी रुपये खर्चून शिंगणापूर पाणी योजना सुरू करण्यात आली.
पंचगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा
यावेळी शिंगणापूर पंचगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. मात्र, हा बंधारा बांधल्यापासून आजतागायत या बंधाऱ्याचे बरगे संबंधित विभागाकडून पावसाळ्या अगोदर कधीही वेळेत काढण्यात येत नाहीत. त्यामुळे एक-दोन दिवस पावसाचा जोर वाढला की हा बंधारा पूर्ण पाण्याखाली जातो. यावर्षीही पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळंं पाऊस सुरु असूनही बंधाऱ्याचे बरगे काढण्यात आले नाहीत. त्यामुळे सध्या शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे खूपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, पाडळी बुद्रुक, प्रयाग चिखली, हणमंतवाडी, शिंगणापूर या भागातील शेतीला याचा मोठा फटका बसत आहे.
बंधाऱ्यावरून धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू
या मार्गावरून बऱ्याचदा दिवसा आणि रात्रीही धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असते. असे असतानाही प्रशासनाकडून वाहतुक बंद व्हावी यासाठी फलक अथवा बॅरिकेट्स लावली जात नाही. कित्येकदा शिंगणापूर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याची कल्पना जिल्हा आपती व्यवस्थापन विभागाला देखील नसते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने बंधाऱ्याचे बरगे काढावेत आणि योग्य वेळीच ते घालावेत अशी मागणी शेतकरी आणि परिसरातील गावातून होत आहे.
Web Title: Heavy rain in kolhapur big increase in panchganga river bed rajaram dam under water nryb