लोणावळ्यात मुसळधार पाऊस
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळाले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. पुणे शहरासह लोणावळ्यातही पाऊस झाला. लोणावळा शहरात मागील 24 तासांत तब्बल २२१ मिलिमीटर (८.७० इंच) पावसाची नोंद झाली. यामुळे हंगामातील एकूण पावसाचे प्रमाण ११६६ मिलिमीटरवर पोहोचले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ग्रामीण भागातील ओढे-नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
कार्ला-मळवलीत रस्ते पाण्याखाली
कार्ला आणि मळवली परिसरात इंद्रायणी नदीला पूर आल्याने मळवली–देवळे मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. तसेच पाटण परिसरातील अनेक सोसायट्यांमध्येही पाणी घुसले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन
राज्यामध्ये मान्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. यापूर्वी राज्यात तूफान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचे मोठे नुकसान देखील झाले होते. यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा तूफान बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. राज्यसह देशभरामध्ये पावसाने हजेरी लावली असून, यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे.