पुण्यासह परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं; रस्त्यांवर पाणीच पाणी
महाराष्ट्रात रविवारीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अनुभव येत आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असून, पुढील काही दिवस तो कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड जिल्ह्यात अतितीव्र मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.याशिवाय, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज असून, त्यानंतर मंगळवार व बुधवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नद्या, धरणे आणि सखल भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. राज्यात विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने विदर्भासाठी सोमवार (१६ जून) ते गुरुवार (१९ जून) दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यात या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
रायगड – रेड अलर्ट (अतितीव्र मुसळधार पाऊस)
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर (घाट भाग) – ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस)
मुंबई, ठाणे – येलो अलर्ट (मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता)
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली असून, कोकणातील नद्या आणि धरणांच्या पाणपातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. हा पाऊस शेतीसाठी लाभदायक ठरत असला तरी नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे व सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.मुंबईत मागील काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहर आणि उपनगरांत अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील फोर्ट परिसरात सर्वाधिक ७४ मिमी पाऊस पडला असून, त्यानंतर बांद्रा ६२ मिमी, मलबार हिल ६० मिमी, लोअर परळ ५८ मिमी आणि हाजी अली परिसरात ५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ग्रँट रोड – ४७ मिमी
सांताक्रुझ – ४७ मिमी
दादर – ४१ मिमी
चर्चगेट – ३८ मिमी
अंधेरी – ३३ मिमी
मुंबई सेंट्रल – ३० मिमी
बोरिवली – २८ मिमी
वरळी – २६ मिमी
वांद्रे कुर्ला संकुल (BKC) – २५ मिमी
वर्सोवा – २३ मिमी
दिंडोशी – २२ मिमी
संपूर्ण मुंबईत पावसाचा जोर अद्याप कायम असून, नागरिकांना वाहतुकीच्या आणि सखल भागांतील परिस्थितीकडे लक्ष देण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे.