
ऐन नोव्हेंबरमध्ये सांगली, सोलापूरसह 'या' भागांत मुसळधार पावसाचा अंदाज; लातूर, बीडमध्ये तर...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. राज्यात साधारणतः ऑक्टोबरमध्येच हिवाळ्याची चाहूल लागते, पण यंदा परतीचा मॉन्सून अद्याप राज्यात पोहोचला नाही. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळा यंदा उशीरा लागण्याची शक्यता आहे.
एकेकाळी दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा मुसळधार नाहीतर अतिमुसळधार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नोव्हेंबरमध्येही परतीचा पाऊस राज्याला झोडपतो आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला असून, बीड, धाराशिव आणि लातूरसह अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर भागांत वेगवान वारे व जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Cyclone Montha : उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये मुसळधार पाऊस; आंध्र प्रदेशात तिघांचा मृत्यू तर पिकांना मोठा फटका
दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर ६ ते ८ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होईल आणि हिवाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा थंडीचे आगमन पारंपरिक वेळेपेक्षा उशीरा होणार आहे.
परभणी, लातूर, बीडमध्ये विजांसह जोरदार पाऊस
हवामान विभागानुसार, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे आणि सांगलीमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे.
सांगली-सोलापूरमध्ये वादळी पावसाची शक्यता
रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये बुधवारी-गुरुवारी वादळी पावसाची शक्यता, तर शुक्रवारी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस येऊ शकतो.