वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे अचानक जोरदार वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस (Rain in Walchandnagar) झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. तर कळंब, वालचंदनगर, रणगांव परिसरात बत्तीगुल झाल्याने नागरिकांना त्रासदायक ठरले आहे.
वालचंदनगर (ता.इंदापूर) या परिसरात दिवसभर तीव्र उष्णता असल्याने नागरिक घामाघूम झाले होते. उत्तरेकडील बाजूने ढगाळ वातावरणात निर्माण झालेले होते. परिसरात वादळी वारे जोराने वाहू लागल्याने नागरिकांना हवेत गारवा जाणवू लागला होता. मात्र, काही क्षणार्धात विजेच्या कडकडाटाला सुरूवात होऊन जोरदार पावसाला सुरूवात झाली.
रोहिणी नक्षत्रातल्या पहिल्याच दिवशी पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात पेरणी पूर्व मशागती शेतकऱ्याने करून ठेवले होते व चातकाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वेळे आधीच पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांत समाधान दिसून येत आहे.