अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे; शासनाने उचललं 'हे' महत्त्वाचं पाऊल
मुंबई : अवजड वाहने आणि खासगी बस चालक व मालकांकडून राज्यभरात बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या संपात मुंबईतील सुमारे 30 हजार शाळांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसचा समावेश असेल असेही म्हटले जात होते. मात्र, अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, वाहतूकदारांच्या संपाची दखल घेऊन शासनाने समिती स्थापन केली आहे.
या संपात जेएनपीटी परिसरातील 38 हजार कंटेनर वाहतूक करणाऱ्या चालकांचाही यात समावेश असेल, असे सांगण्यात आले होते. एलपीजी वाहक, पाणी टँकर, शाळा बसेस, प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या सर्वच प्रकारच्या खासगी व अवजड वाहनांच्या संघटनाही या संपात सहभागी होणार होत्या. त्यातच या संपाला ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस, बस अँड कार कॉन्फेडरेशन (दिल्ली), महाराष्ट्र राज्य ट्रक, टँकर, टेम्पो महासंघ, स्कूल बस संघटना, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, एलपीजी ट्रान्सपोर्ट संघटना अशा देशभरातील आणि राज्यातील महत्त्वाच्या संघटनांचा पाठिंबा मिळाला होता.
दरम्यान, या संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळेच आता वाहतूकदारांच्या संपाची दखल घेऊन शासनाने समिती निर्माण केली आहे, त्याचा शासन निर्णयही जारी केला गेला आहे. अशातच अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी संप तूर्तास मागे घेतला आहे. समिती गठीत झाल्यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी संप तूर्तास मागे घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत होणार चर्चा
या सर्व वाहन चालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. ही बैठक जर सकारात्मक झाली तर संप होणार नाही. मात्र, जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संप पुढे पुकारला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : Bus Drivers Trike : 30 हजार स्कूल बससह खासगी बस चालक उद्यापासून बेमुदत संपावर; शाळा, आषाढी वारीवर परिणाम होण्याची शक्यता
विद्यार्थी वाहतुकीवर परिणामाची शक्यता
या संपामुळे सर्वसामान्यांवर विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि आषाढी वारीच्या तयारीत असलेले वारकरी यांच्यावर मोठा परिणाम होण्याची चिन्हं आहेत. सध्या राज्यात शाळा सुरू झाल्या असून, हजारो विद्यार्थी खासगी स्कूल बसवर अवलंबून असतात. अशावेळी बससेवा बंद पडल्यास त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. दुसरीकडे, आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असून, राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढते आहे. मात्र, बससेवा बंद राहिल्यास त्यांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होईल. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.