
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हाय अलर्ट'; अनेक ठिकाणी वाढवली सुरक्षा
छत्रपती संभाजीनगर : राजधानी दिल्लीत मोठा स्फोट झाला. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विशेष खबरदारी घेतली जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोटामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ वर्षांपूर्वी वेरूळला शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक शहरे हिटलिस्टवर होती.
संभाजीनगरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचा लोंढा जास्त असल्याने यावेळी ती खबरदारी घेण्यात आली, त्यामुळे रात्री वाहनांची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय विमानतळ, रेल्वेस्थानक पर्यटनस्थळे येथील बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. मागे झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये ज्या संशयितांचा सहभाग होता त्यांची नव्याने झाडाझडती करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेने विविध पथकांना दिले आहेत. विशेषत: विमानतळाची सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जात आहे.
हेदेखील वाचा : Delhi Blast : राजधानी दिल्लीतील स्फोट पूर्वनियोजितच; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर…
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विदेशी पर्यटकांना घेऊन डेक्कन ओडीसा पर्यटक रेल्वे शहरात दाखल झाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात परिसरात एनएसजी सराव झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. छत्रपती संभाजीनगर हे देशातील संवेदनशील शहरांच्या यादीत असल्याने या सरावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तीन दिवस चाललेल्या सरावानंतर या मोहिमेमुळे भविष्यातील दहशतवादविरोधी कारवाई अधिक परिणामकारक ठरेल.
सोमवारी सायंकाळी झाला होता स्फोट
देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे.
हेदेखील वाचा : ‘पार्किंग नाही, स्लो मूव्हिंग कारमध्ये झाला ब्लास्ट, आत लोक…’, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचांचा खुलासा