Ichalkaranji News: 'उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे छायाचित्र पाठवा अन्...; इचलकरंजी महापालिकेचे आवाहन
अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे. शहरातील कोणत्याही परिसरात एखादा नागरिक घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा रस्त्यावर अथवा इतरत्र ठिकाणी टाकत असल्याचे आढळून आल्यास या व्यक्तीचा जीपीएस प्रणालीद्वारे छायाचित्र घ्यावे आणि महापालिकेच्या (७०३०६०३९३९) या व्हाट्सअॅप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन केले आहे.
संबंधित व्यक्तीला ५०० रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. त्यातील २० टक्के रक्कम म्हणजे १०० रुपये छायाचित्र पाठविणाऱ्या व्यक्तीस बक्षीस दिले जाणार आहे. तसेच कचरा टाकणाऱ्याचे छायाचित्र समाज माध्यमातून प्रसारित जाणार आहे. इचलकरंजी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरातील कचरा उठावाचा ठेका दिला आहे पण शहरात आजही कचऱ्याचे ढीग पहावयास मिळते. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच शहरात कचरा मोठ्या प्रमाणात साचत आहे. हे कुणीच नाकारू शकत नाही. आपले अपयश लपविण्यासाठी आता नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे छायाचित्र पाठवा आणि बक्षीस मिळवा ही योजना सुरू केली आहे.
शहरातील नागरिकांनी घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा इतरत्र न टाकता परिसरात येणाऱ्या घंटा गाडीतच टाका व दंडात्मक कारवाई सारखे कटू प्रसंग टाळा.
– आयुक्त पल्लवी पाटील