तुम्ही अद्याप ई-केवायसी केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशन कार्ड होणार बंद
तासगाव : आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डबाबत देखील ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
तासगाव तालुक्यातील सर्व रेशनकार्डधारकांनी 30 जूनअखेर आपले रेशन कार्ड एक केवायसी करून घ्यावे, असे आवाहन तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे तासगाव पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेशन दुकानात जाऊन करा ई-केवायसी
रेशनकार्डधारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई-केवायसी करण्याची सोय आहे. या रेशन दुकानदारांकडे 4G-ePOS मशीन आहेत. या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते. यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो. यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
ई-केवायसी नसलेले रेशन कार्ड होणार बंद
30 जूनपर्यंत ज्या ग्राहकांचे रेशन कार्ड ई-केवायसी होणार नाही. त्यांचे कार्ड बंद करण्यात येणार आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ ही मिळणार नाही. शासनाने ई-केवायसी सर्वांसाठी बंधनकारक केली आहे.
18 लाख कार्ड करण्यात आले बाद
शिधापत्रिका धारकांना राज्य सरकारकडून अन्न धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यामध्ये असेही अनेक जण आहेत, जे या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. मोठी नोकरी आणि बलाढ्य पगार असून देखील शिधापत्रिकाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. अशा सर्वांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. यामुळे अनेक मोठा धक्का बसला आहे.