मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यात सीमावाद पेटला आहे. तसेच यावरुन राजकारण देखील तापले आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा सीमावादावरुन वातावरण तापले आहे. आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्र-कर्नाटक वादावर पत्रकार परिषद (Press conference) घेत कर्नाटक सरकार तसेच मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
[read_also content=”जळगावात प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/jodo-maro-protest-against-mla-prasad-lad-image-in-jalgaon-351468.html”]
दरम्यान, आता सीमा प्रश्नांवर भूमिका घेण्याची वेळ आलीय, असं शरद पवारांनी म्हटले. बेळगावमध्ये (Belgaon) आज जो हल्ला झालाय त्याचा निषेध. महापरिनिर्वाण दिनी घडलेला हा प्रकार निषेधार्थ आहे. सीमाभागातील प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा एकिकरण समितीचे मेसेज आले आहेत. बेळगावमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच सतत मराठी भाषिकांवर सतत अन्याय केला जात आहे. यावर आपण आम्हाला पाठिंबा द्यावी, असा मेसेज मराठा एकिकरण समितीचा आला आहे. हा वाद कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाढला आहे. हा वाद दोन्ही राज्यातील राज्यकर्त्यांनी सामोपचाराने सोडविला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
…नाही तर आमचा पण संयम सुटेल
पुढे बोलताना पवार म्हणाले की, येत्या २४ तासात मराठी भाषिकांवर हल्ले थांबले नाहीत, तर आमचा देखील संयम सुटेल, असा इशारा शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. तसेच केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये. बोम्मईची वक्तव्य वाद वाढविण्यास कारणीभूत असल्यांच पवार म्हणाले. बेळगावमध्ये मराठी भाषिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. बोम्मईकडून चिथावणीखोर वक्तव्य होत आहेत. कुणी कायदा हातात घेतला तर त्यांची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असं पवार म्हणाले. गुजरात व कर्नाटकच्या सीमेवर आताच या गोष्टी का घडत आहेत? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. कुणीतरी जाणीवपूर्वक चिथावणी देतंय असं वाटतंय. सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. आम्ही अजूनपर्यंत संयम पाळला आहे. पण हल्ले असेच सुरु राहिल्यास आमचा संयम सुटू शकतो, असा इशारा पवारांनी कर्नाटक सरकारला दिला.
मुख्यमंत्र्यांवर टिका
यापूर्वी जरी अशी परिस्थिती निर्माण झाली तरी, तेव्हा महाराष्ट्रातील त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली होती. पण सध्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी यावर कोणतीच भूमिका घेतली नाही. असं म्हणत पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली. कर्नाटकात निवडणुका जवळ आल्यात, त्याच्यामुळं तरी हा प्रकार घडत नाहीय ना? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. बोम्मईची वक्तव्यं देशासाठी घातक असून, हे सर्व ठरवून केल्यासारख वाटत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.