मुंबई: IIT-बॉम्बेमधील (IIT-Bombay) वसतिगृहात शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी स्वतंत्र जागा मंजूर केल्यावरुन आधीच विद्यार्थाी आणि प्रशासनामध्ये वाद सुरू असताना आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आयआयटी-बॉम्बे 12, 13 आणि 14 वसतिगृहांच्या मेस कौन्सिलने एका विद्यार्थ्याला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच कारण म्हणजे, या विद्यार्थ्याने शाकाहारी भोजनासाठी नियुक्त केलेल्या जागेवर मांसाहार केला, त्यामुळे मेस कौन्सिलने विद्यार्थ्याला कडक दंड ठोठावला.
IIT बॉम्बेच्या तीन वसतिगृहाच्या मेसमध्ये शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी जेवणाचे 6 टेबल निश्चित करण्याच्या निर्णयाविरोधात आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी आंदोलन करत होते. यावेळी तीन ते चार विद्यार्थ्यांनी निदर्शने केलेल्या ठिकाणी मांस खाण्याचा निर्णय घेतला, ज्याला त्यांनी ‘वैयक्तिक सविनय कायदेभंग’ असं नाव दिलं.
या दरम्यान वसतिगृह 12 च्या एका विद्यार्थ्याला दंड ठोठावण्यात आला आहे, तर इतर दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यावर ‘अनियमित वर्तन’ आणि ‘शालेय नियमांचे उल्लंघन’ केल्याचा आरोप आहे. मेसमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज फूड टेबल वेगळे करण्याला विद्यार्थी विरोध करत असत. गुरुवारी मनाई केल्यामुळे त्याने शाकाहारी भोजनासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी खुलेआम मांसाहार केला, त्यानंतर मेस कौन्सिलने त्याला कठोर शिक्षा केली.
IIT बॉम्बेच्या काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी मेसच्या काही भागांना ‘केवळ शाकाहारी’ (vegetarian) म्हणून अनधिकृतपणे चिन्हांकित केल्यामुळे IIT-बॉम्बेमध्ये जातिभेदावरुन चांगलाच आरोप प्रत्यारोप होत होता. या घटनेच्या काही महिन्यांनंतर, कॅम्पस वसतिगृह आणि मेस प्रशासनाने आता अधिकृतपणे वसतिगृहात शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी सामान्य मेसच्या जागेत स्वतंत्र जागा मंजूर केली आहे, जिथे फक्त शाकाहारी भोजन करणारे लोकच बसू शकतात.