
फोटो सौजन्य - Social Media
चौकांत अधिकारी आणि तीन ते चार कर्मचारी उपस्थित असूनही वाहतूक नियमित न ठेवता उलट कोंडीच वाढू लागल्याने तैनात कर्मचाऱ्यांची भूमिका नेमकी काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. काही वेळा कोंडी इतकी तीव्र होते की दोन मिनिटांचा प्रवास पंधरा ते वीस मिनिटांत पूर्ण करावा लागतो. अनेकदा रिक्षा, दुचाकी, मालवाहतूक गाड्या आणि खासगी चारचाकी वाहने एकाच वेळी चौकातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याने अराजकतेचे वातावरण निर्माण होते. (Buldhana)
विशेष म्हणजे, वाहतूक शाखेत नेमलेले अनेक कर्मचारी वाहतूक व्यवस्थापनाचे औपचारिक प्रशिक्षण नसतानाच ड्युटीवर तैनात केल्याचे बोलले जाते. चौकात चार कर्मचारी असतानाही वाहनांचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी अधिक गुंतागुंत निर्माण होत असल्याने नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. काही कर्मचारी फक्त चलान फाडण्यावर जास्त भर देतात आणि प्रत्यक्ष वाहने मार्गदर्शन करून कोंडी कमी करण्याकडे दुर्लक्ष करतात, अशी टीकाही वाहनचालकांकडून होत आहे. कोंडीत अडकलेले चालक कर्मचारी हस्तक्षेप करून मार्ग मोकळा करतील या अपेक्षेने उभे राहतात; मात्र कर्मचारी उपस्थित असूनही कोणतेही स्पष्ट दिशादर्शन होत नाही, अशी तक्रार वारंवार समोर येते. त्यातच ट्रॅफिक सिग्नलची अकार्यक्षमता, चौकांत पार्किंग करणारी वाहनं, रस्त्यांवरील खडीकरणाची कामे व अनियमित वेगाने निघणाऱ्या वाहनांमुळे परिस्थिती आणखी बिघडते.
वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर होतो, व्यापाऱ्यांचे व्यवहार बिघडतात, रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवेतील वाहनांना मार्ग मिळत नाही, अशा अनेक समस्यांचा रोजचा अनुभव नागरिक घेत आहेत. शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वाहनांची संख्या दुपटीने वाढली; परंतु रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक नियंत्रणाची तयारी मात्र त्यानुसार उभी राहिलेली नाही. नागरिकांचे म्हणणे आहे की, चलान वसुलीपेक्षा वाहतूक शाखेने प्रत्यक्ष चौकांवर उभे राहून वाहनांच्या हालचालीला दिशा देणे, ज्या ठिकाणी सतत कोंडी होते त्या मार्गांचे तांत्रिक पुनर्रचना करणे, अतिरिक्त प्रशिक्षित कर्मचारी नेमणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. वाहतूक विभागाने या समस्येकडे गांभीर्याने पाहत ठोस उपाययोजना केल्यासच शहरातील दैनंदिन कोंडी कमी होईल आणि वाशिमकरांच्या त्रासाला दिलासा मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.