
फोटो सौजन्य - Social Media
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी पिंपळगाव राजा येथे सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्रांना भेट देत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पर्यवेक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.
पाहणीदरम्यान विविध नोंदवही, गणनापत्रके आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून कामकाजाची गुणवत्ता पडताळण्यात आली. पुनरिक्षण प्रक्रिया नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याची खात्री करून घेत डॉ. पुरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावर आलेल्या नागरिकांशीही संवाद साधत मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली.
तसेच बीएलओ आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम वेळेत, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराची नोंद होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर आयोजित बैठकीत अधिकारी, कर्मचारी आणि बीएलओ यांना एसआयआर कार्यक्रमाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्यावरील उपाययोजनांबाबतही सूचना देण्यात आल्या. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत कार्यक्रमाची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचे आवाहन डॉ. पुरी यांनी यावेळी केले. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा पाया असल्याने तिची अचूकता आणि विश्वासार्हता कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाची नोंद सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, बीएलओ आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीमुळे एसआयआर कार्यक्रमाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार असून, मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.