Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील सुविधांबाबत यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने मुंबईतील सायनसह इतर रुग्णालयांमध्ये रेफर केल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोपही केला गेला आहे.
शास्त्रीनगर हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे. मात्र या हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा हॉस्पिटल प्रशासनाची पोलखोल झाली आहे. एक महिला एका बाळाला घेऊन बेडवर बसली आहे आणि दुसरी महिला व्हिडिओ काढत आहे. ज्यामध्ये व्हिडिओ काढणाऱ्या महिलेचा आरोप आहे की मुलगा गंभीर असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार केले जात नाही. फक्त सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर देखील समोर आले आहेत, जे सांगतात की आम्ही उपचार करतोय.
मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णांना दिली जात असलेल्या वागणूकीमुळे संताप निर्माण होत आहे. नागरिकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. घटनेच्या दिवशी रमेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी एका गरोदर महिलेला उपचाराऐवजी सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती दिल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आता पुन्हा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे शास्त्रीनगर रुग्णालयातील आरोग्य सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयातील सुविधा सुधारल्या जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






