Inspection of Sant Dnyaneshwar Maharaj's palanquin ceremony route and resting place
सासवड : महाराष्ट्राचा वैचारिक सोहळा म्हणून वारकऱ्यांच्या वारीकडे पाहिले जाते. वर्षानुवर्षे ही भक्तीची पालखी आणि पताका मिरवून वारी सुरु आहे. आता पुणे जिल्ह्याला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आता दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर क्षेत्र आळंदी देवस्थानकडून पालखी मार्गावरील पालखी विसावा ठिकाणी आणि मुक्कामाची ठिकाणे यांचा आढावा घेण्याचे काम सुरु झाले आहे.
पालखी मार्गावरील सर्वात मोठा मुक्काम असलेल्या सासवडमधील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची देवस्थानकडून पाहणी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 22 जून रोजी सासवडमध्ये आगमन होत असून 23 रोजी दुसरा मुक्काम झाल्यावर 24 जूनला सासवडमधून पंढरपूरच्या मार्गावरील जेजुरीकडे मुक्कामासाठी प्रस्थान सुरु होणार आहे. या निमित्ताने पुरंदरमधील पालखी मुक्कामाची व्यवस्था, दुपारचा विसावा आदी ठिकाणांची पाहणी करून तिथे मिळणाऱ्या विद्युत, पाणी, स्वच्छता, सुरक्षा या गोष्टींचा आढावा, देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा, अडचणी जाणून घेण्यात आल्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिका करा
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, बाळकृष्ण मोरे, दिंडी समाज संघटना सचिव मारुती कोकाटे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, विजयराव वढणे, मनोहर जगताप, सुहास लांडगे, संदीप जगताप, नायब तहसीलदार सोनाली वाघ, बांधकाम अभियंता स्वाती दहिवाल, सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी आदी उपस्थित होते.
काम तातडीने पूर्ण करावे, घाटापासून सासवड आणि पुढे जे काम सुरु आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, जर रस्ता पूर्ण झाला तर त्याचा वापर पूर्णपणे करण्यात येईल. काम अपूर्ण असल्यास नवीन रस्त्याचा वापर न करता त्याला बैरिकेटिंग करून यावर्षी जुन्याचा मार्गाचा वापर करण्यात येईल. पालखीतळाकडे जाणारा रस्ता प्रशासनाने अगोदर मोकळा करावा, अशा सूचना आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नातेपुते येथे देखील विश्वस्तांनी पाहणी केली आहे. आषाढी पालखी सोहळ्याचे नियोजन करून घेण्यासाठी आळंदी येथील देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व इतर मान्यवर यांनी केली पालखी मुक्कामी जागेची पाहणी केली. तसेच तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या. आळंदी येथील देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त योगी निरंजन नाथस सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, भावार्थ देखणे देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी ज्ञानेश्वर वीर, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार यांनी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामी नातेपुते या ठिकाणची पाहणी केली. यावेळी नगरपंचायत व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी यांना विविध सूचना दिल्या.
यावेळी विश्वस्त योगी निरंजन नाथ म्हणाले, सांप्रदायिक समाज दिंडी सोहळ्यात वाढ होत आहे, यामुळे जागा अपुरी पडत आहे. त्याबद्दल सर्व अधिकारी यांनी विचार करून पालखी सोहळ्याचे नियोजन करावे. प्रांताधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या, जागेचा प्रश्न आम्ही सगळे एकत्र करून चर्चा करून निर्णय घेऊ. उपनगराध्यक्ष अतुल बापू पाटील म्हणाले, दरवर्षी आषाढी वारीसाठी येणारा निधी उपलब्ध होत नाही. गेल्या दोन वर्षांपासून अनुदान आलेले नाही. वास्तविक नगरपंचायतचा निधी वाढवून दिला आहे, पण प्रत्यक्षात होत नाही. यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.