वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) काँग्रेसचे बंडखोर आमदार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या प्रचारासाठी आज मिरजमध्ये (Miraj) सभा घेणार आहेत. विशाल पाटील याच्या प्रचार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरात लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या सर्वच उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारामध्ये सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. प्रकाश आंबेडकर सभा घेण्यापूर्वीच त्यांच्यावर प्रकाश शेंडगे यांनी टीका केली आहे. धनदांडग्या नेत्यांची भेट झाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) एका तासात आपला निर्णय बदलला, असे म्हणत प्रकाश शेंडगेंनी प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला आहे.
प्रकाश शेंडगेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका
ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे. वंचित पक्ष वंचित समाजासाठी आहे की धनदांडग्यांसाठी? असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच धनदांडगे प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि त्यानंतर एका तासात असं काय घडलं की त्यांनी सुप्रिया सुळे आणि विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचे ठरवले, असा प्रश्न देखील प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा विचार करावा
वंचित बहुजन, ओबीसी आणि मागासवर्गीय यांना सोबत घेऊन जर चळवळ एकत्रित चालवली तर चालू शकेल अन्यथा धनदांडगे चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा विचार करावा. त्यांनी पुन्हा एकदा विचार करून आपला निर्णय मागे घ्यावा, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. आनंदराज आबेडकर यांनी प्रकाश शेंडगे याना सांगली लोकसभेसाठी पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.
सध्या सांगली लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील याना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजपचे संजय काका पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रींगणात उतरले आहेत. मात्र चंद्रहार पाटलांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने विशाल पाटील हे नाराज झाले आहे. महाविकास आघाडीकडून ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही.