
PCMC, Smart City Scam,
महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही शहरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर केला.
स्मार्ट सिटी कंपनीवर शिवसेनेचे निलेश बारणे यांची नियुक्ती करण्याचा विषय चर्चेला आला असता, नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव नगरसेवकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने घायाळ झाले. ३००० हून अधिक सीसीटीव्ही बंद का? १५ हजारांचे मीटर १ लाखाला का घेतले? आणि कोट्यवधींच्या गुंतवणुकीतून पालिकेला उत्पन्न का मिळत नाही? या प्रश्नांना यादव यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.
“केवळ लिपस्टिक-पावडर लावून शहर स्मार्ट होत नाही, लोकांच्या गरजा पहा,” असा टोला योगेश बहल यांनी लगावला. तर, भाऊसाहेब भोईर यांनी “ही स्मार्ट सिटी आहे की डर्टी सिटी?” असा बोचरा प्रश्न विचारला. पिंपळे सौदागर सारख्या भागातच सर्व निधी खर्च करून उपनगरांना वाऱ्यावर सोडल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. राहुल कलाटे, अनंत कोऱ्हाळे, डॉ. वैशाली घोडेकर आणि विश्वजीत बारणे यांनी स्मार्ट पार्किंग, कमांड सेंटर आणि रखडलेल्या सायकल प्रकल्पावरून प्रशासनावर जोरदार प्रहार केला.
शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनी आकडेवारीनिशी प्रशासनाचे वाभाडे काढले. शहरात बसवण्यात आलेल्या ८,७९० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक बंद आहेत. ९८० कोटींची गुंतवणूक होऊनही स्मार्ट पार्किंग आणि कमांड कंट्रोल सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू नाही. सायकल शेअरिंग प्रकल्प गुंडाळला गेल्याने आणि मेट्रो-पीएमपीच्या ‘वन कार्ड’चे स्वप्न भंगल्याने नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठा प्रशासकीय घोटाळा झाल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. १५ हजारांचे पाण्याचे मीटर १ लाख रुपयांना खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संदीप वाघेरे यांनी केली. यावेळी सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव नगरसेवकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने निरुत्तर झाले होते.