पुर्वेश सरनाईक यांचे आरोपांना प्रत्युत्तर (फोटो सौजन्य-X)
Pro Govinda League Season 3 News in Marathi : प्रो गोविंदा सीझन ३ च्या नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातून एकूण १२७ गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. खेळाच्या नियमानुसार जे सर्वात पहिले ३२ संघ नोंदणी करतील त्यांना या स्पर्धेत स्थान दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. तरी देखील राजकारण करून आयोजकांनी आम्हाला बाद केले अशी बदनामी जय जवान गोविंदा पथक करत आहे. या त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. निवड प्रक्रिया ही केवळ नियमांनुसार केली जाते, अशी स्पष्ट भूमिका प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी मांडली.
प्रो गोविंदा सीझन ३ साठी नोंदणी केलेले संघ हे दापोली, रत्नागिरी, सांगली, वसई, विरार,पालघर, मुंबई, ठाणे असे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. सर्व प्रथम नोंदणी केलेल्या ३२ संघांना सीझन ३ मध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. जय जवान गोविंदा पथक जो आमच्यावर आरोप करत आहेत त्यांचा नोंदणी प्रक्रियेतील क्रमांक ४१ स्थानावर होता. मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बालवीर गोविंदा पथक ३७ व्या क्रमांकावर होता असे अनेक गोविंदा पथकं आहेत जी यापूर्वी प्रो गोविंदा मध्ये सहभागी झाली होती. पण ती यावेळी पहिल्या ३२ संघांत नोंदणी न करू शकल्यामुळे यंदाच्या सीझन ३ मध्ये सहभागी होऊ शकली नाहीत.
जय जवान पथकाने ५ जुलै २०२५ रोजी एका कार्यक्रमात मानवी मनोरे सादर केल्यामुळे स्पर्धेतून वगळण्यात आले, असा दावा केला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली होती आणि २८ जून रोजी १६ संघांची पहिली यादीही जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे, हा आरोप पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे, असे पुर्वेश सरनाईक यांना स्पष्ट केले.
राज्यभरातून अनेक लहान-मोठ्या गोविंदा पथकांना प्रो गोविंदा सीझन ३ मध्ये आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. आम्ही कोणत्याही पथकाच्या भावना दुखावू इच्छित नाही, परंतु सर्वांना समान संधी देण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात, असे सांगत त्यांनी सर्व सहभागी पथकांचे स्वागत केले.