फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी एकत्र येत दिल्लीसमोर लढा उभारला पाहिजे, असे वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असणाऱ्या मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या वादावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी अनेकांनी विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. याच वादावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाद बाजूला ठेवत मनोज जरांगे आणि भुजबळांनी एकत्र यावं, असा सल्ला बच्चू कडूंनी दिला आहे.
बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला मराठा आणि ओबीसी समाजातील वाद आता शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत राहिला पाहीजे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, ही जरांगेंची मागणी रास्त आहे. पण सगळे मराठे ओबीसीमध्ये आले तर ओबीसीमध्ये अडचण निर्माण होईल, असा संशय नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. हा संशय सुद्धा वास्तविक आहे. त्यामुळे आता या समस्येवर उपाय काढण्यासाठी मनोज जरांगे आणि भुजबळांनी त्यांच्यातील वाद बाजूला ठेऊन एकत्र येत दिल्ली समोर लढा उभा केला पाहिजे. ओबीसी मधील आरक्षणाचा कोटा कसा वाढविता येईल यासाठी याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी मी मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांना उद्या किंवा परवा भेटणार आहे. या भेटीवेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढणार आहे.
मराठा समाजातील सगेसोयरेंच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. १३ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेत उतरणार, असा इशारा देखील जरांगेंनी सराकारला दिला आहे.