जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा, म्हणाले; विधानसभेत गुन्हेगार...
जत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील मतचोरी मान्य आहे. आजपर्यंत बऱ्याच चोऱ्या ऐकायला मिळाल्या परंतु आता मत चोरीचा प्रकार पहायला मिळतोय. राज्याच्या विधानसभा सभागृहात रेकॉर्डवरील गुन्हेगार दाखल झाल्यामुळे सभागृहात विचार मांडणेदेखील अवघड झाले आहे, अशी जोरदार टीका आमदार जयंत पाटील यांनी केली. जत येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, सभापती सुजय शिंदे, जिल्हा बँक संचालक मन्सूर खतीब, प्रा. सुकुमार कांबळे, संजय कांबळे, अविनाश वाघमारे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे कमी शिकले असले तरी त्यांनी जागतिक स्तरावरचे दर्जेदार साहित्य समाजाला दिले. त्यांच्या साहित्याचा अनुवाद तब्बल सत्तावीस भाषांमध्ये झाला आहे. त्यांच्या लेखनात तारतम्य, तोल व शालिनता होती. अलीकडे जतकरांना अरेरावीची भाषा ऐकावी लागत असल्याचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. काहीजण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे. त्यामुळे हे निवडणूकाचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, असंही जयंत पाटील म्हणाले.
वसंतदादा पाटील ते पतंगराव कदम यांनी देखील भाषेची शालिन परंपरा कायम ठेवली. सांगली जिल्ह्याने ही परंपरा टिकवून ठेवली असून, अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या व्याख्यान व पुरस्कार सोहळ्यात या परंपरेचे स्मरण करणे महत्त्वाचे आहे. असंही जयंत पाटील म्हणाले.
विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अण्णा भाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून महाराष्ट्राच्या मातीत वैचारिक चळवळ उभी केली. जाती-धर्माच्या भिती मोडून काढून समाजात एकता निर्माण केली. त्यांनी जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण केले असून, त्यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालाच पाहिजे.
विशाल पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर तपासणी करताना आधार कार्ड पुरावा मान्य न करता जमीन किंवा घराच्या कागदपत्रांची अट घातली आहे. हे सामान्य गोरगरिबांसाठी अन्यायकारक ठरणार असून, जणू शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी २०२९ ची लढाई ही नव्या स्वातंत्र्य लढ्यासारखीच लढावी लागेल. तसेच दिल्लीतील सरकारला अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी भाग पाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.