मुंबई : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे (Chinchwad Constituency) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक (Bypoll) होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा (BJP) प्रयत्न आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केले आहे.
अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यानुसार, या सर्वांनी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही. 40 जणांना मंत्रिपदाचे आमिष दाखवण्यात आले. पण त्याची पूर्तता झालेली नाही’.
पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचं काही कारण नाही. भाजपने कोल्हापूर, आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. त्याचबरोबर देगलूरची निवडणुकही बिनविरोध झाली नाही. त्यामुळे या पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
अनेक कामांना स्थगिती
आमदार प्राजक्त तनपुरे आणि निलेश लंके यांनी मतदारसंघात अनेक कामे मंजूर करुन आणले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने त्याला स्थगिती दिली. हे स्थगिती सरकार आहे. आम्ही पूर्वीच्या कामाला कधी स्थगिती दिली नाही. प्राजक्त आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले. अजित पवार सकाळी लवकर कामाला सुरुवात करतात. तर यात काय वाईट आहे. काहीजण सकाळी टाकायला सुरुवात करतात मी कामाला सुरुवात करतो.
…इतरांचा अनादर नको
प्रत्येकाला आपल्या जाती-धर्माबाबत अभिमान असला पाहिजे आणि हा असायलाच पाहिजे. आपल्या जात-धर्माचा आदर करताना इतरांचा अनादर नको, याची काळजी घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.