मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून अचानक माघार
ऐन विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमाराजे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाने चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा-मधुरिमाराजेंनी अर्ज मागे घेताच सतेज पाटील चांगलेच भडकले; म्हणाले, “दम नव्हता तर उभं, मी पण…”
विधानसभेच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सुरुवातीपासूनच माजी नगरसेवक राजू लाटकर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या 24 तासांत काँग्रेसने मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव जाहीर केलं. त्यामुळे नाराज राजू लाटकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता.
अर्ज माघार घेण्यासाठी स्वत: मधुरिमाराजे छत्रपती, शाहू महाराज छत्रपती, सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्यामुळे मधुरिमाराजे छत्रपती यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
‘नाईलाजाने माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही, ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर शाहू महाराज यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनेच अर्ज मागे घेतल्यानंतर आता काँग्रेसकडे या मतदारसंघातून उमेदवार नाही. त्यामुळे बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकरांनाच पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिंदे गटाने माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे.