kolhapur Rain: कोल्हापुरात वरूणराजाची दमदार बॅटिंग; 'ही' धरणे भरली, चांदोलीमधून १४ हजार क्युसेकने विसर्ग
कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली ता. शिराळा येथील वसंत सागर हे धरण ८५ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. १ जून पासून आज अखेर १९४९ मिली मीटर पाऊस पडला असून ३४.३९ टीएमसी क्षमतेचा पाणीसाठा असलेल्या धरणात २९. २४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणातून १४८८० क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात होत असून पाणी पात्रा बाहेर पसरले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस सुरु आहे. कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे.