
एक वर्षाची प्रतीक्षा संपली,वनतारातून नांदणी मठाकडे माधुरीची घरवापसी; आरोग्याच्या सूचनांसह परतीला मंजुरी
माधुरीच्या परतीसाठी सुनावणी
माधुरीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. मठामध्ये माधुरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, तिच्या निवासस्थानाची व्यवस्था तसेच आरोग्यविषयक उपाययोजनांची माहिती उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात आली होती. माधुरीला परत आणण्याच्या मागणीवर बुधवारी उच्चस्तरीय समितीसमोर ऑनलाइन सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये मठाच्या वतीने माधुरीसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. संबंधित अहवाल आणि उपलब्ध व्यवस्थेचा विचार केल्यानंतर समितीने माधुरीला नांदणी मठात परत नेण्यास मंजुरी दिली.
पुनर्मागणीचा अर्ज मंजूर
नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी सांगितले की, उच्चस्तरीय समितीने माधुरी हत्तीणीच्या पुनर्मागणीचा अर्ज मंजूर केला आहे. मात्र, तिच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश समितीने दिले आहेत. माधुरीचे वनताराकडून मठ संस्थानाकडे हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर माधुरीची आरोग्य तपासणी करून तिचे हस्तांतरण करण्यात आले.
माधुरीच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश
माधुरीच्या निवासस्थानाबाबतही उच्चस्तरीय समितीने काही सूचना दिल्या आहेत. वन्यजीव कायद्यांतर्गत अपेक्षित असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन नांदणी मठ संस्थानाकडून देण्यात आले आहे. तसेच माधुरीच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासह समितीने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तब्बल ४०९ दिवसांनंतर मठात दाखल
गुरुवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास विशेषॲनिमल ॲम्बुलन्समधून माधुरीचा नांदणीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तिच्यासोबत सुमारे ४० जणांचे तज्ज्ञ पथक असल्याची माहिती देण्यात आली. वनतारा आणि उच्चस्तरीय समितीच्या सकारात्मक भूमिकेनंतर अखेर माधुरीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला असून, तब्बल ४०९ दिवसांनंतर ती पुन्हा नांदणी मठात दाखल होणार आहे.