Sangli News : 'पुरावा असणाऱ्या लोकांना कुणबी दाखला देणार'; तहसीलदार अतुल पाटोळे यांची माहिती
तासगाव : तासगाव तालुक्यातील 26 गावात कुणबी नोंदी सापडल्या असून, त्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे जुने मोडी लिपीतील पुरावे असतील तर तसे प्रस्ताव तयार करून दिल्यास दाखले देण्यात येणार आहेत, असे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले. तर ज्या रेशनकार्डधारकांना केवायसी केली आहे. त्यांनाच धान्याचा लाभ मिळणार आहे. अन्यथा केवायसी न केल्यास धान्य बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सधन लोकांनी स्वतःहून रेशनकार्ड वरील धान्याचा लाभ सोडावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, तासगाव तालुक्यात 43 हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. उर्वरित 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी काढलेली नाही. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यांनी लवकर फार्मर आयडी काढून घ्यावी. तसेच कृषी सेवा केंद्रातून बियाणे व खतांचे लिंकिंग केले जाते, ते शेतकऱ्यांना घेणे जबरदस्तीचे नाही. तशा औषध दुकानदारांना सूचना दिल्या असून, दुकानाबाहेर बोर्ड लावायला सांगितला आहे, असे तहसीलदार अतुल पटोले यांनी सांगितले.
मांजर्डे (ता.तासगाव) येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास बाबर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराजस्व अभियानात शैक्षणिक दाखल्यांचे वाटप तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रेशनकार्डवरील नाव कमी करणे किंवा वाढवणे, दुबार, जीर्ण शिधापत्रिका नवीन तयार करणे, डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये ई-पीक पाहणी करण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
मयत खातेदारांची वारस नोंद, संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा लाभ देणे,7/12 उतारावरील एकुमॕ शेरा कमी करणे, 7/12 उतारा वरील अपाक शेरा कमी करणे, 7 / 12 वरील इतर हक्कातील महिलांची नावे कमी करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त करून घेण्यात आले. तसेच विविध योजना आणि उपक्रमांची माहिती या शिबिरात देण्यात आली.