वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद चिघळण्याची शक्यता; या नेत्याने केला समाधी हटवण्यास विरोध
रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं शिल्प कपोल कल्पित असून रायगडावरून ते हटवाव अशी मागणी केली आहे. तसं पत्रही देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं असून ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्यास विरोध दर्शवला आहे, त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या समोर वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे ते हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्या संदर्भात ओबीसी आणि धनगर समाजाकडून माझी संभाजी राजेंना विनंती आहे की किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे. मात्र रायगडाची नासधूस केली जात असून कुत्र्याचं स्मारक हटवण्यास आमचा विरोध आहे.
संभाजी राजेंनी ३१ मे ही तारीख का निवडली आहे. ३१ मे रोजी मातोश्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असते. यावेळची जयंती ही त्रिशतकोत्तर आहे. त्यामुळे यावर आमचा आक्षेप आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याआधीच संभाजीराजे भोसलेंनी ३१ मे चा अल्टिमेटम का निवडला? विशाळगडाप्रमाणे वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून घेऊन महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीनं २०१२ साली जेव्हा हा पुतळा काढण्यात आला होता. त्यावेळी इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी वाघ्या कुत्र्याच्या इतिहासावरील पुस्तक प्रकाशित केलं होतं. वाघ्या कुत्र्याच्या इतिहासासंदर्भात अधिक माहिती देताना संजय सोनवणी म्हणतात, “इ.स. १६७८ मध्ये राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. मोहिमेवरून परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवलं होतं. या युद्धात बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. पण, तरीही लढाई थांबलं नाही. येसाजीची शूर पत्नी मल्लाम्मा हिनं लढाई सुरूच ठेवली. तिच्याच्या सैन्यात महिलांचंही सैन्य होतं. या युद्धात तिला विजय मिळवणं अशक्यच होतं. त्यामुळं तिने शिवाजी महाराजांसोबत तह केला. एक महिला असूनही वीरांगणेप्रमाणे युद्ध करते, म्हणून शिवरायांनी तिचे राज्य तिला परत तर दिले. तसेच तिला ‘सावित्रीबाई’ या किताबानेही गौरवं केला.
“मल्लाम्मानं शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरूपी ठेवण्यासाठी पाषाणशिल्प उभी केली. अनेक गावांच्या दरवाज्यांत आणि मंदिरांसमोर ही शिल्प उभी केली. या शिल्पांमध्ये वाघ्या कुत्रादेखील पाहायला मिळतो. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेला यादवाड नावाच्या खेड्यात अजूनही उपलब्ध आहे,” असे अनेक पुरावे वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात उपलब्ध असल्याचं सोनवणी सांगतात.