
TASGAON SHINE ची जागतिक झेप; तासगाव-कवठेमहांकाळ MIDC साठी 1100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्यपत्रे
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ MIDC ला जागतिक औद्योगिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून मुंबईतील विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस अमेरिका व जपानमधील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आमदार रोहित पाटील यांनी TASGAON SHINE या संकल्पनेअंतर्गत तासगाव-कवठेमहांकाळ MIDC चे सविस्तर सादरीकरण करत औद्योगिक क्षमता, पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक विकास आणि रोजगारनिर्मितीचा रोडमॅप मांडला. या सादरीकरणाने प्रभावित होऊन दोन नामांकित कंपन्यांनी सुमारे ११०० कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीसाठी स्वारस्यपत्रे (Letter of Intent – LOI) सादर केली. त्यामुळे योगेवाडी–मनेराजुरी MIDC मध्ये परदेशी उद्योग उभारणीचा मार्ग अधिक वेगाने खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बैठकीत इंडो-अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्सचे डॉ. सुधीर पारीख यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळ तसेच जपान इकॉनॉमिक्स अँड ट्रेड कमिटीचे योगेंद्र पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेचे जागतिक स्तरावर सादरीकरण करण्यासाठी आणि तासगाव MIDC मध्ये परदेशी उद्योग आणण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाकडून या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन देत तासगाव-कवठेमहांकाळचा औद्योगिक विकास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आमदार रोहित पाटील यांनी दिवंगत आर. आर. (आबा) पाटील यांच्या “मातीला अंतर देऊ नका, माती तुम्हाला अंतर देणार नाही” या विचारांचा उल्लेख करत, “ही केवळ MIDC नाही, तर आबांचे स्वप्न आहे. स्थानिक हातांना जागतिक स्वप्नांची जोड देणारी ही लोकांची MIDC असेल,” अशी भावना व्यक्त केली.
बैठकीस राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या.
स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा
११०० कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीसाठी प्राप्त झालेल्या स्वारस्यपत्रांमुळे तासगाव-कवठेमहांकाळ परिसरात उद्योगवाढ, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “TASGAON SHINE” ही संकल्पना आता तासगावच्या औद्योगिक परिवर्तनाची नवी ओळख ठरणार असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
आमदार रोहित पाटील हे अभ्यासू, झपाटून काम करणारे युवा लोकप्रतिनिधी आहेत. कमी वयात ते तासगाव-कवठेमहांकाळच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोलाचे योगदान देत आहेत. त्यांचे व्हिजन केवळ मतदारसंघापुरते मर्यादित नसून महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला दिशा देणारे आहे. अशा तरुण नेतृत्वामुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळेल.