शिरुर : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. कल समोर येत असून यामध्ये महाविकास आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून शिरुर व बारामती हे दोन मतदारसंघ प्रतिष्ठेचे बनले होते. यामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढत होणार होती. शिरुरचे मविआचे उमेदवार अमोल कोल्हे यांना पहिल्या मतमोजणीच्या फेरीपासून आघाडी मिळत आहे. तर अमोल कोल्हे हे सप्तधेनु गोमातेसमोर उपासना व ध्यानधारणा करत आहेत. शिरुरमध्ये काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सप्तधेनुची उपासना
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे निकालाच्या दिवशी ध्यानधारणेला बसले आहे. मतमोजणी ही सकाळी 8 पासून सुरु झाली असून अमोल कोल्हे हे देखील उपासना करत आहेत. गाईच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या सप्तधेनु गोमातेसमोर अमोल कोल्हे हे बसले आहेत. ध्यानमग्न झालेल्या अमोल कोल्हे यांचा फोटो व्हायरल होत आहे. पिवळ्या रंगातील कुर्ता घालून ते ध्यानधारणा करत आहे.
अमोल कोल्हे गड राखतील?
लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शिरुर हा लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. अजित पवार यांनी प्रचारामध्ये अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणुकीआधी अजित पवार गटामध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. चुरशीची व प्रतिष्ठेची ही लढाई झाल्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. अमोल कोल्हे हे पहिल्या फेरीतील मतमोजणी पासून आघाडीवर आहेत. अगदी हजारोंच्या मतांनी अमोल कोल्हे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. सध्या अमोल कोल्हे हे 45 हजारांनी आपली आघाडी ठेवून आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे हे आपला शिरुरचा गड राखतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.