कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवरुन आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट हे एकमेकांच्या समोर आले आहेत. कारखान्याच्या निवडणुकीवरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता थेट लोकांच्या समोरच डागण्यात येत आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलं होतं.
त्यानंतर आता काय होणार अशी अवस्था पोलिसांची तर कार्यकर्त्यांमध्ये आता कंडक पाडायचंच अशी झाली होती. यादरम्यान साडेसात पावणे आठच्या सुमारास माजी आमदार अमल महाडीक हे बिंदू चौकात दाखल झाले. त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
साडेसात वाजले आहेत. मी त्यांची वाट बघतोय. आज आम्ही घाबरलेलो नाही ते आम्हाला भ्याले आहेत. त्यावर त्यांची समजूत काढत पोलिसांनी महाडिक यांना पाठवून दिले. यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी करेक्ट सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान आपण दसरा चौकात आलो होतो. मात्र महाडिक यांनीच सत्तेचा गैरवापर करत पोलिसांमार्फत आम्हाला तेथे थांबवल्याचा घणाघात केला.
बिंदू चौकात तणावपूर्ण वातावरण
अमल महाडकांनी माजी आमदार सतेज पाटील यांना संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात येऊन समोरासमोर चर्चा करावी असे आव्हान दिले होते. यामुळे सकाळपासून सतेज पाटील हे आव्हान स्वीकारणार का याची जोरदार चर्चा सुरू होती. तर महाडिक गटाकडून काउंटडाऊन देखील सुरू करण्यात आला होता अशातच सतेज पाटील यांनी माजी आमदार अमल महाडिक यांना २०१९ च्या निवडणुकीत पराभूत करून आमदार झालेले ऋतुराज पाटील येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे दिवसभर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळालं.
अशातच काल भीम जयंती असल्याने हजारो अनुयायी बिंदू चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्तेही येथे आल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. यासाठी पोलीस प्रशासनाने देखील मोठा फौजफाटा तैनात केला आणि दोघांना एकमेकांसमोर येण्यापासून रोखलं. मात्र दोघांकडून देखील आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले.