राजकारणात मैत्री ना शत्रू! राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाऊ शकतं मुख्यमंत्रिपद; हे तीन मुद्दे ठरू शकतात महत्त्वाचे
महाराष्ट्राची यंदाची निवडणूक फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशातच ऐतिहासिक म्हणावं लागेलं. दोन पक्ष दोन्ही राष्ट्रीय पक्षांसोबत युती आणि आघाडीत आहेत. त्यामुळे दिल्लीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यंदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. त्यात ८४ वर्षांच्या शरद पवारांनी प्रचारासाठी अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे राज्यातील सत्तेच्या चाव्या या ना त्या कारणाने शरद पवार यांच्याकडे राहतील अशी चर्चा देशभरात रंगली आहे.
महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांची आवश्यकता आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल आणि २६ नोव्हेंबरला विधानसभा कार्यकाळ समाप्त होणार आहे. ३ दिवसांत जर सरकार स्थापनेसाठी दावा करण्यात आला नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.
राष्ट्रपती राजवट लागू झाली तर निर्णय केंद्र सरकारच्या हातात जाऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी राजकीय पक्ष सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा शरद पवार उठवू शकतात. २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी पवारांनी अर्थ व गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे ठेवलं होतं.
महाराष्ट्रातील विविध एक्झिट पोलमध्ये शरद पवार व अजित पवार यांच्या गटाला मिळून ७० जागा मिळण्याचा अंदाज आहे. यातील ४२ जागांवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्येच थेट सामना आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३८ विधानसभा जागांवर शरद पवार व ६ जागांवर अजित पवार यांच्या गटांना आघाडी मिळाली होती. मात्र या आकड्यांत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजित पवार यांनी निवडणुकीत भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांचा उघडपणे विरोध केला. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या राजकीय प्रभावामुळे यंदा मुख्यमंत्रिपद पवार कुटुंबाकडे जाऊ शकतं, अशी चर्चा आहे.
शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाशी जवळीक ठेवत नाहीत किंवा शत्रुत्वही ठेवत नाहीत. २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा देणारे पवार २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंसोबत गेले. त्यांच्या गटातील उमेदवार नवाब मलिक यांनी अलीकडेच सांगितले की, शरद पवार कोणत्याही गटासोबत जाऊ शकतात. या वेळी महाविकास आघाडी व महायुती दोघांनीही मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठीची शर्यत अजून संपलेली नाही.
८४ वर्षीय शरद पवार यांनी निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली. त्यांनी तब्बल ५५ सभांना संबोधित केले आणि महाराष्ट्राला नवीन दिशा देण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं. इस्लामपूरमधील एका सभेत त्यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल मोठे विधान केले. पवार म्हणाले की, जयंत पाटील यांनी संपूर्ण राज्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात करावी. या विधानामुळे पवारांच्या मनात काय सुरू आहे, याबद्दल चर्चेला उधाण आलं आहे.
१९९५ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावर बसण्याची संधी मिळालेली नाही. ते चार वेळा किंगमेकर ठरले, पण मुख्यमंत्रिपदापासून दूर राहिले. त्यांच्या पक्षातील छगन भुजबळ व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत.
महाविकास आघाडीत शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ८९ जागांवर निवडणूक लढवत आहे. यातील ४२ जागांवर त्यांचा सामना अजित पवार यांच्या गटाशी आहे, तर उर्वरित ४७ जागांवर त्यांचा सामना भाजप व शिवसेनेशी (शिंदे गट) आहे. अजित पवार ६० जागांवर लढत आहेत, जिथे बहुतेक ठिकाणी त्यांचा सामना काँग्रेसशी आहे.