FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली औषधांची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक आणि विक्रीतील नियमांचे पालन यांची अधिक काटेकोरपणे पडताळणी करण्यात येत आहे.
नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द
एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत राज्यातील औषध उत्पादन आस्थापनांच्या १२० आणि विक्री आस्थापनांच्या ३४७ अशा एकूण ४६७ तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्या वेळी दरमहा सरासरी सुमारे २३४ तपासण्या होत होत्या. मात्र, जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत उत्पादन आस्थापनांच्या ९६५ आणि विक्री आस्थापनांच्या ३,२९१ अशा एकूण ४,२५६ तपासण्या करण्यात आल्या. या कालावधीत मासिक सरासरी तपासण्यांची संख्या १,०६४ वर पोहोचली. म्हणजेच अवघ्या काही महिन्यांत तपासण्यांचा वेग सुमारे ४.६ पटींनी वाढला. उत्पादन आस्थापनांच्या मासिक तपासण्या सुमारे चारपट, तर औषध विक्री आस्थापनांच्या तपासण्या सुमारे ४.७ पटींनी वाढल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत FDA ने राज्यभरात एकूण ४,७२३ तपासण्या केल्या. यामध्ये औषध उत्पादन करणाऱ्या आस्थापनांच्या १,०८५ आणि औषध विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या ३,६३८ तपासण्यांचा समावेश आहे. या तपासण्यांदरम्यान औषधांची गुणवत्ता, परवाना अटींचे पालन, औषधांचा साठा, विक्रीची वैधता आणि इतर नियमांची अंमलबजावणी यांची पडताळणी करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन आढळलेल्या औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांविरोधात प्रशासनाने नियामक कारवाई केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत एकूण १,६८१ नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामध्ये उत्पादन आस्थापनांना २७३ आणि विक्री आस्थापनांना १,४०८ नोटिसा देण्यात आल्या. याशिवाय ३५४ परवाने रद्द करण्यात आले. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील ८६ आणि विक्री क्षेत्रातील २६८ परवान्यांचा समावेश आहे. तसेच १,२२७ परवाने निलंबित करण्यात आले. त्यापैकी १३३ उत्पादन आस्थापनांचे, तर १,०९४ विक्री आस्थापनांचे परवाने आहेत. अशा प्रकारे सहा महिन्यांत परवाने रद्द आणि निलंबित करण्याच्या एकूण १,५८१ नियामक कारवाया करण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत केवळ तपासण्यांची संख्याच वाढलेली नाही, तर निश्चित उद्दिष्टपूर्तीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात सुधारले आहे. एप्रिल-मे २०२६ मध्ये तपासणी उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण सुमारे २९ टक्के होते. जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे प्रमाण १३१ टक्क्यांवर पोहोचले. उत्पादन आस्थापनांच्या तपासणी उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण २६ टक्क्यांवरून १०६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर विक्री आस्थापनांच्या तपासणी उद्दिष्टपूर्तीचे प्रमाण ३१ टक्क्यांवरून १४१ टक्क्यांवर पोहोचले.
अन्न व औषध प्रशासनाच्या शोध आणि जप्तीच्या कारवायांमध्येही मोठी वाढ झाली आहे. एप्रिल-मे २०२६ या दोन महिन्यांत आठ शोध व जप्ती कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुमारे १.१२ कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला होता. मात्र, जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत तब्बल ११५ शोध व जप्ती कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये सुमारे १९.११ कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला. अशा प्रकारे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत एकूण १२३ शोध व जप्ती कारवायांमध्ये सुमारे २०.२३ कोटी रुपयांच्या औषधसाठ्यावर कारवाई करण्यात आली.
FDA च्या अंमलबजावणी मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या नियमभंगाच्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एप्रिल-मे २०२६ मध्ये दोन गुन्हे दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. तर जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आणि १४ जणांना अटक करण्यात आली. म्हणजेच सहा महिन्यांत एकूण ३५ गुन्हे दाखल झाले असून, १५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत FDA ने विविध प्रकारच्या औषधविषयक उल्लंघनांविरोधात कारवाई केली. यामध्ये विनापरवाना औषधसाठा आणि विक्रीच्या ४३ कारवायांचा समावेश आहे. औषधे व जादूटोणा उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, १९५४ अंतर्गत आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात ३१ कारवाया करण्यात आल्या. बनावट औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित १४, चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या नामांकनाच्या सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित १० आणि गुंगीकारक औषधांच्या गैरवापराविरोधात NDPS कायद्यांतर्गत नऊ कारवाया करण्यात आल्या. याशिवाय वैद्यकीय उपकरणांशी संबंधित तीन, फसव्या साधर्म्याच्या ब्रँड नावांबाबत तीन आणि लेबलविषयक उल्लंघनांबाबत दोन कारवाया करण्यात आल्या.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. “नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही अन्न व औषध प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यांत तपासण्यांची संख्या तसेच अंमलबजावणी कारवायांमध्ये झालेली लक्षणीय वाढ ही प्रशासनाच्या सजगतेचे द्योतक आहे. बनावट, निकृष्ट व विनापरवाना औषधांचा बाजारात शिरकाव होऊ नये यासाठी राज्यभर तपासणी मोहीम अधिक व्यापक करण्यात येईल आणि दोषींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
राज्यातील औषध उत्पादन आणि विक्री व्यवस्थेत नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक व्यापक केली आहे. औषधांची गुणवत्ता, वैध परवाने, योग्य साठवणूक आणि विक्रीतील पारदर्शकता यांची पडताळणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
गेल्या सहा महिन्यांत झालेल्या तपासण्या, परवाना कारवाया आणि जप्तीच्या आकडेवारीतून औषध क्षेत्रातील नियामक देखरेख वाढल्याचे दिसून येते. आगामी काळातही बनावट, निकृष्ट आणि विनापरवाना औषधांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Ans: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत एकूण ४,७२३ तपासण्या केल्या. यामध्ये औषध उत्पादन आस्थापनांच्या १,०८५ आणि औषध विक्री आस्थापनांच्या ३,६३८ तपासण्यांचा समावेश आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान मासिक सरासरी तपासण्यांमध्ये सुमारे ४.६ पट वाढ झाली
Ans: एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान FDA ने एकूण १,५८१ परवान्यांवर कारवाई केली. त्यामध्ये ३५४ परवाने रद्द करण्यात आले, तर १,२२७ परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांना १,६८१ नोटिसा बजावण्यात आल्या.
Ans: महाराष्ट्र FDA ने सहा महिन्यांत १२३ शोध व जप्ती कारवाया केल्या. या कारवायांमध्ये सुमारे २०.२३ कोटी रुपये किमतीचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला. विविध प्रकरणांत ३५ एफआयआर दाखल करण्यात आले असून, १५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.






