मुंबई : राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजून लागला आहे. भाजप या निवडणुकीमध्ये मागे पडली असून याचा फटका त्यांना देशाच्या राजकारणामध्ये बसला आहे. राज्यामध्ये महायुतीला 48 जागांपैकी फक्त 17 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला 30 जागा मिळल्या आहेत. राज्यामध्ये भाजप पेक्षा जास्त जागा कॉंग्रेसला मिळाल्या असून एकूण 13 जागा आणि अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यामध्ये कॉंग्रेसचे पारडे जड झाले आहे. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस जास्त जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार गट व ठाकरे गट यांना इशारा दिला होता. ‘कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून मोठा भावासारखा महाविकास आघाडीमध्ये आहे. जागावाटपावेळी देखील कॉंग्रेसने मोठ्या भावाची भूमिका बजावली असून लहान भावांनी लहान भावांसारखं रहावं,’ असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत राजकारण सुरु आहे का असा सवाल विचारला जात होता. यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी विधानसभेच्या जागावाटपाबद्दल वक्तव्य केले आहे.
काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याच्या विचारात
माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी करावी लागेल. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याच्या विचारात आहे. लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी साडे तीन महिने गेले. विधानसभेत हे टाळावे लागेल. त्यासाठी महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. म्हणूनच आत्तापासूनच तयारी करावी लागेल. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा फायदा झाला. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले. आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरु,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.