Maharashtra News :दुष्काळाविरोधात महाराष्ट्रात पुन्हा जलचळवळ! आमिर खानच्या उपस्थितीत 'वॉटर कप' अभियानाचा शुभारंभ; २० हजार गावांचा सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा शुभारंभ झाला. राज्यातील २० हजार गावांचा सहभाग आणि ८० हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असून, एप्रिल-मे २०२७ मध्ये स्पर्धा होणार आहे.
फोटो सौजन्य AI
water cup competitionफोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • दुष्काळाविरोधात सर्वांनी एकत्र यावे; फडणवीसांचे आवाहन

  • २० हजार गावांचा सहभाग; ८० हजार नागरिकांना प्रशिक्षण

  • आमिर खान म्हणाले, सामूहिक प्रयत्नांतूनच होणार परिवर्तन

Maharashtra News : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावागावांत जलसमृद्धी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

या अभियानाला केवळ सरकारी योजना न ठेवता लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील सुमारे २० हजार गावांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दुष्काळाविरोधात सर्वांनी एकत्र यावे; फडणवीसांचे आवाहन

मुंबईतील वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. 'आपला एकच पक्ष म्हणजे दुष्काळ विरोधी पक्ष', असे सांगत त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी काम करण्याचे आवाहन केले.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 'कन्व्हर्जन्स, कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन' या तीन बाबींवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची नियोजित कामे पूर्ण करावीत.

प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीमध्ये विलंब होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियान ३.० आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची सांगड वॉटर कप अभियानाशी घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

फोटो सौजन्य AI
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर हक्क? राज्य सरकारचा मोठा निर्णय

२० हजार गावांचा सहभाग; ८० हजार नागरिकांना प्रशिक्षण

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत राज्यातील सुमारे २० हजार गावांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रत्येक गावातील किमान चार नागरिक किंवा स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, एकूण ८० हजार नागरिक प्रशिक्षित होतील.

राज्यातील ४० प्रशिक्षण केंद्रांवर १५ जानेवारी २०२७ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर एप्रिल आणि मे २०२७ मध्ये प्रत्यक्ष स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पाणी फाउंडेशनच्या मास्टर ट्रेनर्समार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल.

यापूर्वी २०१६ ते २०१९ या काळात राज्यातील ७६ तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा राबविण्यात आली होती. यंदा एल निनो आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ही स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो सौजन्य AI
Shooting Competition: पुण्यात नेमबाजीचा महाकुंभ! ७५०० नेमबाजांचा सहभाग

आमिर खान म्हणाले, सामूहिक प्रयत्नांतूनच होणार परिवर्तन

कार्यक्रमाला उपस्थित असलेले अभिनेता आमिर खान यांनीही या अभियानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. जलयुक्त शिवार अभियानाच्या सुरुवातीच्या काळात पाणी फाउंडेशनने शासनासोबत काम केले होते. प्रशासन, सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि विविध भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अवघ्या तीन वर्षांत ही चळवळ ७५ तालुक्यांपर्यंत पोहोचली होती, असे त्यांनी सांगितले.

पाण्याचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे ऐतिहासिक काम करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे आमिर खान म्हणाले. दरम्यान, या अभियानात नगरपंचायती आणि लहान नगरपरिषदांचाही समावेश करण्यासाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येणार आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे वाढवून महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेतून ठेवण्यात आले आहे.