
Maharashtra Weather Alert: 13 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; विदर्भात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा अंदाज
विदर्भात पावसाचा जोर वाढणार
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यांचाही अंदाज आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्याही विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता
जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तसेच वादळी सरींचा अंदाज आहे.
मराठवाड्यातही पावसाचे संकेत
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांना सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी सरींचाही अंदाज आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नसून मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे अनेक भागांत उष्ण आणि दमट हवामान जाणवत आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
कोकणात पावसाची प्रतीक्षा कायम
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील काही दिवस या भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. एकूणच, राज्यातील हवामानात पुन्हा बदल होत असला तरी सर्वदूर पाऊस झालेला नाही. सध्या विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव परिसरात पावसाची शक्यता अधिक आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.