पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; कोंडी सोडवण्यासाठी खुद्द पोलिस उपअधीक्षक रस्त्यावर
कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दुपारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दिवाळी सणासाठी चाकरमान्यांचा प्रवास असताना अचानक गॅस कंपनीने खुदाईचे काम सुरू केले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली. सुमारे दोन-तीन तास रेंगाळलेल्या वाहतुकीमुळे प्रवासी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कल्पना ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने खुदाईचे काम थांबवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.
वसूबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळी सणानिमित्त पुणे-मुंबईहून गावाकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू होती. कोल्हापूर नाक्यावरील समर्थ हॉस्पिटलजवळ गॅस कंपनीने केलेल्या खुदाईमुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक कोयना पूल, पाटण तिकाटणेपर्यंत जाम झाली होती.
वाहतूक कोंडी वाढल्यानंतर अनेक वाहनचालकांनी जुन्या पुलावरून बैल बाजार मार्गे नांदलापूर येथे महामार्गावर जाण्याचा पर्याय निवडला. मात्र, शहरात दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे जुन्या कोयना पुलावरही वाहनांची मोठी रांग लागली. परिणामी, शहराच्या आत-बाहेरील वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, प्रशासनाकडून महामार्गावरील कोणतेही काम वाहतूक विभागाशी समन्वय न साधता सुरू करू नये, असा इशारा गॅस कंपनीला देण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे काम सुरू केल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशा सूचना तहसील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पोलिसांची धावपळ, नागरिक त्रस्त
कोंडी वाढत असताना वाहतूक पोलिसांनी मोठी कसरत करून वाहनांना मार्गदर्शन केले. गॅस कंपनीचे खुदाईचे काम बंद करण्यात आल्यानंतरच वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. दरम्यान, सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.
पोलीस उपअधीक्षक रस्त्यावर
वारुंजी फाटा ते नांदलापूर दरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमानी, नागरिक अडकून पडले होते. यावेळी वाहतूक पोलिसांसह महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि महामार्ग व्यवस्थापन, तसेच कराड आणि मलकापूर नगरपालिका कर्मचारी यांच्यावर वाहतूक कोंडी सुरळीत करताना मोठा ताण निर्माण झाला. ही बाब निदर्शनास येताच कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी होते. पोलीस उपअधीक्षकांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल कराड व मलकापूरच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हेदेखील वाचा : हिंजवडी ‘IT पार्क’ घेणार मोकळा श्वास! वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय