
खंबाटकी घाटातील नवा बोगदा जूनपासून खूला
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अपघातप्रवण आणि वेळखाऊ ठरणाऱ्या खंबाटकी घाट परिसरात उभारण्यात आलेला नवा बोगदा (टनेल) आणि व्हायाडक्ट येत्या जून महिन्यापासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणांचा त्रास संपून प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
खंबाटकी घाटातील जुना रस्ता अरुंद, तीव्र वळणांचा आणि उतार-चढावाचा असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात होत असत. विशेषतः अवजड वाहनांमुळे संपूर्ण घाटात वाहतूक ठप्प होण्याचे चित्र नित्याचे होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन बोगदा आणि उंचावरील पूल (व्हायाडक्ट) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला.
हेदेखील वाचा : खंबाटकी घाटात वाहनांची मोठी वाहतूक कोंडी! खंडाळ्यापर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
या प्रकल्पात सुमारे १.३ किलोमीटर लांबीचा अत्याधुनिक बोगदा आणि १.२ किलोमीटरचा व्हायाडक्ट उभारण्यात आला आहे. बोगद्यात अग्निसुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था, वायुवीजन आणि प्रकाशयोजना अशा सर्व आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रचना करण्यात आल्याने हा मार्ग पुढील अनेक वर्षे उपयोगी ठरणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या घाट पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे ४० ते ४५ मिनिटे लागत होती. मात्र, नव्या बोगद्यामुळे हेच अंतर अवघ्या ७ ते १० मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा तसेच कोल्हापूर, कर्नाटकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ, इंधन आणि मनस्ताप मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
प्रकल्पाचा टप्पा चाचणी स्वरुपात सुरु
प्रकल्पाचा एक टप्पा आधीच चाचणी स्वरूपात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यापर्यंत दोन्ही बाजूंचा बोगदा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यानंतर घाटातील जुना धोकादायक रस्ता वापरण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
प्रवाशांकडून प्रकल्पाचे स्वागत
स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी संघटनांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. अपघातांची संख्या घटेल, प्रवास अधिक सुरळीत होईल आणि पुणे-सातारा महामार्गावरचा ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एकूणच, खंबाटकी घाटातील हा नवा बोगदा केवळ रस्ते प्रकल्प न राहता पश्चिम महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा देणारा ‘माईलस्टोन’ ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.