
Marathi Breaking news live updates- पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्यामुळे धरणांमध्ये लक्षणीय पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या प्रमुख धरणांमध्ये एकूण २०.२७ टीएमसी (६९.५२%) पाणीसाठा झाला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १ टीएमसीने अधिक आहे. पवना धरण सध्या ९४ टक्के भरले असून उजनी धरण १०० टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर आहे. या वाढीमुळे पुणे शहर आणि परिसरातील संभाव्य पाणीटंचाईचा धोका आता दूर झाला आहे.
09 Jun 2025 05:51 PM (IST)
Local Train Accident: ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाला. मात्र आता यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
09 Jun 2025 05:49 PM (IST)
क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या तरुण खासदार प्रिया सरोज लग्न करणार आहेत. त्यांचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार आहे. त्याआधी, काल ८ जून रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनऊमधील एका ५ स्टार हॉटेलमध्ये झाला. या द सेंट्रम हॉटेलच एका दिवसाचे भाडे लाखोंमध्ये आहे.
09 Jun 2025 05:04 PM (IST)
माथेरान मध्ये सध्या २० ई रिक्षा चालवल्या जात असून सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने हातरिक्षा चालक यांना अमानवी प्रथेतून मुक्त करण्यासाठी ई रिक्षा चालवण्याचे धोरण न्यायालयाचे आहे.मात्र माथेरान शहरातील ९४ हातरिक्षा चालक यांच्या पैकी केवळ २० हातरिक्षा चालक यांचा ई रिक्षा चालवण्यास मिळाल्या आहेत.त्यात माथेरान दस्तुरी नाका ते हुतात्मा स्मारक माथेरान बाजारपेठ या अंतरासाठी प्रति माणसी ३५ दर आकारला जात असल्याने तीन ते चार माणसे ओढणाऱ्या हात रिक्षा मध्ये कोणीही पर्यटक बसत नाही.त्यामुळे व्यवसाय होत नसल्याने आणि गिऱ्हाईक मिळत नसल्याने शहरात पर्यटकांची ने आण करण्यासाठी असलेल्या ७४ हातरिक्षा चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे माथेरान मधील हातरिक्षा चालक यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.आज पासून शहरातील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झाले असून शुभम गायकवाड आणि नागेश कदम हे हात रिक्षाचालक उपोषणाला बसले आहेत.
09 Jun 2025 04:48 PM (IST)
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजता घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थरारक पुरावा आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनमधून पाच प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना थरकाप उडवणारी असली तरी रेल्वे प्रशासनाच्या बाजूने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही आणी हीच बाब धक्कादायक आहे. गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते. ही बाब नवीन नाही, मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कुणाची?
09 Jun 2025 04:48 PM (IST)
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारं सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे कपल सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलं आहे. सध्या सोनाक्षीची तब्येत बिघडली आहे. तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिने Covid-19 ची चाचणी देखील केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली आणि तिने स्वतः तिच्या इन्स्टा स्टोरीवर याबाबत माहितीही दिली.
09 Jun 2025 04:47 PM (IST)
भारतीय मार्केटमध्ये अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे Audi. नुकतेच कंपनीने त्यांची लोकप्रिय सेडान Audi A4 Signature Edition व्हर्जन लाँच केली आहे. हे नवीन व्हर्जन केवळ उत्तम परफॉर्मन्स आणि अनेक प्रीमियम फीचर्ससह येत नाही. ही आलिशान कार विशेष डिझाइन एलिमेंट आणि प्रीमियम फीचर्ससह सुसज्ज आहे. भारतात ही कार 57.11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे.
09 Jun 2025 04:46 PM (IST)
मुलाचे भविष्य घडवण्यात शालेय शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. शैक्षणिक मूल्य रचनेपासून ते एकूणच ज्ञानापर्यंत, ते त्यांच्यासाठी एक पाया रचते. तथापि, आजचे शालेय शिक्षण केवळ पुस्तके आणि ब्लॅकबोर्डपुरते मर्यादित नाही; आजचे पाया उच्च दर्जाचे आहे जे दर्जेदार शिक्षण, इष्टतम वाढीसाठी सर्वोत्तम साधनांचा जागतिक अनुभव सुनिश्चित करते.
देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अर्थात अंबानी कुटुंब कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी नीता अंबानी त्यांच्या नातवासह क्रिकेट स्टेडियममध्ये आल्या होती. त्यानंतर आता त्यांचा नातू कोणत्या शाळेत जातो, आणि त्या शाळेची फी किती आहे याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
09 Jun 2025 04:45 PM (IST)
आज लंडनमध्ये होणाऱ्या अमेरिका आणि चीनमधील व्यापार चर्चेमुळे जागतिक बाजारपेठेत वाढ झाल्यामुळे सोमवारी (९ जून) भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. यामुळे, सलग चौथ्या व्यापार सत्रात बाजार हिरव्या रंगात राहण्यात यशस्वी झाला. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात ०.५% कपात करण्याच्या आणि रोख राखीव प्रमाण (CRR) कमी करण्याच्या निर्णयामुळे बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाली याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
09 Jun 2025 04:33 PM (IST)
‘हाऊसफुल ५’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
अक्षय कुमारच्या कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ ने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली आणि हे सिद्ध केले की हा चित्रपट दीर्घ शर्यतीचा सामना करू शकेल. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी २४ कोटी रुपयांचा उत्तम कलेक्शन केला होता. दुसऱ्या दिवशी, शनिवारी, चित्रपटाची कमाई ३१ कोटी रुपये होती, तर रविवारी तिसऱ्या दिवशी, चित्रपटाने ३२ कोटी रुपये कमावले आहेत. यादरम्यान हा चित्रपट चांगलाच हाऊसफुल होताना दिसत आहे.
09 Jun 2025 04:30 PM (IST)
नेटफ्लिक्सने काही काळापूर्वी चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३’ ची घोषणा झाली आहे. एक व्हिडिओ रिलीज करून नेटफ्लिक्सने कपिल शर्माच्या शोची एक मजेदार घोषणा केली आहे. यावेळी, अर्चना पूरण सिंह जजच्या खुर्चीवर असतील की नवजोत सिंह सिद्धू? हे देखील उघड झाले आहे. आता हे निश्चित झाले आहे की नवजोत सिंह सिद्धू या सीझनमध्ये पुनरागमन करणार आहेत. तसेच या शो मध्ये आता चाहत्यांचा दुप्पट मनोरंजन होणार आहे.
09 Jun 2025 04:30 PM (IST)
सोनाली बेंद्रे ही ९० च्या दशकातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. तिने शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे आणि हिट चित्रपट दिले आहेत. परंतु अभिनेत्री सध्या कमी प्रोजेक्ट करत असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सोनालीचे नाव एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जोडले गेले होते आणि त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. त्याच वेळी, सोनालीने एका मुलाखतीदरम्यान यावर मौन सोडले आणि संपूर्ण सत्य सांगितले आहे.
09 Jun 2025 03:38 PM (IST)
बडोदा बीएनपी परिबास अॅसेट मॅनेजमेंट इंडियाने बडोदा बीएनपी परिबास हेल्थ अँड वेलनेस फंड नावाचा एक नवीन म्युच्युअल फंड सुरू केला आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी ९ जून ते २३ जून २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. हा फंड अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल ज्यांना भारत आणि जगातील आरोग्यसेवा आणि वेलनेस क्षेत्राच्या वाढत्या मागणीचा फायदा होऊ शकेल.
09 Jun 2025 02:44 PM (IST)
ठाण्यात सोमवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्व मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवले जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सकाळी सुमारे ९:३० वाजता मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातात लोकलमधून १० प्रवासी ट्रॅकवर पडले. या भीषण घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
09 Jun 2025 02:43 PM (IST)
कोलंबोहून न्हावा शेवा बंदराच्या दिशेने निघालेल्या एमव्ही वान है ५०३ या कंटेनर जहाजात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. डेकखालील ३१५ क्रमांकाच्या स्थानावर, तसेच कोची जवळील १३९ क्रमांकाच्या स्थानावर हा स्फोट झाल्याची नोंद भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे. या घटनेत जहाजावरील चार खलाशी बेपत्ता असून, पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. जहाजावर एकूण २२ कर्मचारी उपस्थित होते. हे जहाज कंटेनरमधून माल वाहून नेत होते.
09 Jun 2025 02:38 PM (IST)
महाराष्ट्राचा सुपुत्र तेजस शिरसे याचे तैवान अॅथलेटिक्स ओपन 2025 मध्ये 110 मीटर अडथळा शर्यतीमध्ये 13.52 सेकंदांच्या, या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट वेळेसह दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन.
तैवान अॅथलेटिक्स ओपनमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राची सुवर्णझेप! 🏆
महाराष्ट्राचा सुपुत्र तेजस शिरसे याचे तैवान अॅथलेटिक्स ओपन 2025 मध्ये 110 मीटर अडथळा शर्यतीमध्ये 13.52 सेकंदांच्या, या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट वेळेसह दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन.… pic.twitter.com/Y3sgi8tfkj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 9, 2025
09 Jun 2025 02:35 PM (IST)
दिल्लीतील त्रिलोकपुरी मेट्रो स्टेशनच्या सिग्नलिंग रूममध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत, आग विझवण्याचे काम सुरू आहे.
09 Jun 2025 02:13 PM (IST)
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवर बोलताना माणसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “रेल्वेची घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र मुंबईच्या रेल्वेमध्ये असे अपघात सातत्याने घडत आहेत. हा विषय केवळ रेल्वेपुरता मर्यादित नाही. आपल्या शहरांचा विचका झाला आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची आपल्याकडे गोष्टच नाहीये. रेल्वे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. कोण येतंय, कोण जातंय हे कळात नाहीये. रस्ते नसल्याने पार्किंग नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.”
09 Jun 2025 01:59 PM (IST)
छत्तीसगडमधील कोंटा-एराबोरा रस्त्यावर दोंड्राजवळ प्रेशर आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एएसपी आकाश राव गिरिपांजे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय इतर अधिकारी आणि सैनिकही जखमी झाले आहेत.
09 Jun 2025 01:01 PM (IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी असल्याची टीका केली आहे. आज सकाळी मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना घासल्याने लटकलेले आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली आहे.
09 Jun 2025 12:18 PM (IST)
स्मार्टफोन कंपनी सॅमसंग मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आता लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेली चाचणी आणि पेटेंटनंतर आता कंपनी लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. हा कंपनीचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन गॅलेक्सी जी फोल्ड या नावाने लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनची लाँच डेट काय असणार, स्मार्टफोनचं डिझाईन कसं असणार आणि त्याचे फीचर्स काय असतील याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
09 Jun 2025 11:54 AM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर राजकीय हालाचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह इतर महत्त्वाच्या पालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार रंगली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मागील हेवेदावे विसरुन पुन्हा एकदा एकत्रित लढत देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मराठी माणसांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
09 Jun 2025 11:16 AM (IST)
नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असतील, लोकलमधून एकूण आठ प्रवासी पडले, ऑटोमेटीक डोअर क्लोजर सिस्टीमच्या नवीन गाड्या येणार आहेत. प्रवासी दरवाज्याच्या फूट बोर्डवर होते , अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
09 Jun 2025 10:55 AM (IST)
तुम्ही देखील IRCTC युजर आहात का? तुम्ही तुमच्या प्रवासाची तिकीट IRCTC च्या मदतीने बुक करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने बनावट तिकीट बुकींग रोखण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय रेल्वेने AI टेक्नॉलॉजीचा वापर करून गेल्या 6 महिन्यांत सुमारे 2.4 करोड अकाउंट बॅन केले आहेत. बनावट तिकिट बुकिंग आणि अन्य घोटाळे रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील अशा घोटाळ्यांमध्ये सहभागी असाल तर आत्ताच थांबा, अन्यथा तुमचे IRCTC अकाऊंट देखील बंद केले जाऊ शकते.
09 Jun 2025 10:07 AM (IST)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून लखनौकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा प्रकार दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान घडला. घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. अपघातानंतरही रेल्वे वाहतूक नियमित असून, कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
09 Jun 2025 09:46 AM (IST)
9 जून रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,796 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,979 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,347 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,960 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,470 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 106.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,06,900 रुपये आहे.
09 Jun 2025 09:46 AM (IST)
जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज ९ जून रोजी सोमवारी तेजीत उघडण्याची शक्यता आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एचडीएफसी बँक, सुझलॉन एनर्जी, अंबुजा सिमेंट्स, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या स्टॉकवर आज लक्ष केंद्रित करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना गो डिजिट जनरल इन्शुरन्स, गोदरेज प्रॉपर्टीज , आदित्य बिर्ला रिअल इस्टेट, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हे पाच शेअर्स खरेदी करण्यासाठी शिफारस केली आहे.
09 Jun 2025 09:43 AM (IST)
शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात आयान आणि फिरोज हे दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर टोळक्याने परिसरातील वाहनांच्या काचा फोडत दहशत माजवली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
09 Jun 2025 09:38 AM (IST)
जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज ९ जून रोजी सोमवारी तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ८१७.५५ अंकांनी म्हणजेच १.४७% ने वाढून ५६,५७८.४० वर बंद झाला, तर आठवड्याचा शेवट १.४९% वाढीसह झाला.
09 Jun 2025 09:35 AM (IST)
राज्यात येत्या ४८ तासांमध्ये (९ व १० जून) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आणि अहिल्यानगर या १३ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. विशेषतः घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.