बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शीजवळील कासारवाडी येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान जम्मू-काश्मीर येथे कार्यरत असताना विठ्ठल खांडेकर (Vitthal Khandekar) हे जम्मू येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले. त्यांना कासारवाडी येथे साश्रूनयनांनी शासकीय इतमामात अखेरचा सलाम देण्यात आला. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
विठ्ठल खांडेकर हे जम्मू काश्मीरच्या पूलवामा येथे देशसेवा बजावत होते. त्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव कासारवाडी येथे आणण्यात आले. जवान विठ्ठल यांचे प्राथमिक शिक्षण कासरवाडी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण बार्शीच्या महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) त्यांची २००४ मध्ये नियुक्ती झाली होती. देशाच्या विविध भागात त्यांनी कार्य केले.
शनिवारी त्यांचे पार्थिव कासारवाडी येथे येताच गावात शोकाकुल वातावरण झाले. त्यांच्या घराजवळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, बार्शी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्यासह तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
विशेष म्हणजे अंत्यसंस्कारासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. विठ्ठल यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. गुढीपाडव्याच्या तोंडावरच विठ्ठल खांडेकर शहीद झाल्याने कासारवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.