

म्हसवड : महेश कांबळे : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या म्हसवडच्या श्री. सिद्धनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या आढावा बैठकीत गोरे यांनी यंदाची सिध्दनाथ यात्रा सर्वोत्तम ठरवण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी गटासह सर्व प्रशासनाला कडक शब्दात सुचना दिल्या आहेत. त्यांचा शब्द खरा करुन दाखवण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी गटाने कंबर कसली असून त्याला पालिका प्रशासनासह इतर प्रशासकीय विभागानेही साथ दिल्याने शहरात यात्रेपूर्वीच्या तयारीला जोर आल्याचे चित्र दिसत आहे.
पुढील महिन्याच्या ९ तारखेला लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव शहरात संपन्न होत असून यानिमित्त भरणाऱ्या यात्रेच्या आढावा बैठकीत जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी पाटील व पोलीस अधिक्षक पिंगळे यांनी प्रशासनाला कडक सूचना देत यात्रा विना अडथळा व कायदा सुव्यवस्था अबादीत राहून सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे तिन्ही मान्यवरांनी म्हसवडकरांना शब्द दिल्याने प्रशासन व सत्ताधारी गटाने कामाला गती दिली आहे.
या बैठकीतच विज वितरण कंपनीवर जयकुमार गोरे यांनी काहीशी नाराजी व्यक्त केल्याने सर्वप्रथम या विभागाने कात टाकून कामाला सुरुवात केली आहे. रथमार्गावरुन जाणाऱ्या विद्युत वाहिनीची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून विना अडथळा विद्युत प्रवाह कसा सुरू राहिल यावर लाईनमॅन तात्यासाहेब तावरे यांनी काम सुरू केले आहे. ज्या - ज्या ठिकाणी विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत, त्या ठिकाणी ताण काढला जात असून, फ्युज बदलले जात आहेत.
तसेच मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी रथमार्गासह संपूर्ण शहरात स्वच्छता मोहिम राबवत माणगंगा नदीपात्राची स्वच्छता करण्यास सुरुवात केली असून रथमार्गावरील अतिक्रमणे काढण्याचा धडाका लावला आहे. यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले असून या पथकाचे प्रमुख सागर सरतापे यांच्याकडे फायर बुलेटची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरातील पंढरपूर सातारा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवताना म्हसवड बसस्थानक चौक व रामोशी वेस येथील चढ काढण्याचे काम तातडीने हाती घेत येथील अतिक्रमणे हटवली जात आहेत.
'हे निर्लज्जपणाचे लक्षण...', रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
पालिकेचे नगरसेवक विजय धट यांनी आढावा बैठकीत जयकुमार गोरेंसमोर यंदाची यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी घेत असल्याचे सांगत यात्रा नियोजनाची धडाकेबाज सुरुवात केली आहे. त्यांना पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी, स्वच्छता सभापती विजय बनगर, सचिन विरकर, निशांत पिसे, धनाजी शिंदे यांची मोलाची साथ मिळत असल्याने या टिमने ग्राऊंडवर उतरत काम सुरू केले आहे. यंदाच्या यात्रेचा कार्यकाल वाढवा यासाठी विविध उपाय योजना राबवणार असल्याचे या टिमकडून सांगितले जात असून यात्रा ही मोठ्या प्रमाणावर भरवण्यासाठी पालिका मालकीसह काही खाजगी जागाही यात्रेसाठी ताब्यात घेणार असल्याचे या टिमकडून सांगण्यात आले.
म्हसवडची श्री सिद्धनाथ यात्रा कधी होणार आहे?
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव पुढील महिन्याच्या ९ तारखेला पार पडणार आहे.
सिद्धनाथ यात्रेच्या तयारीसाठी आढावा बैठकीत कोण उपस्थित होते?
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
सिद्धनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर म्हसवडमध्ये कोणती कामे सुरू आहेत?
यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता, माणगंगा नदीपात्राची स्वच्छता, रथमार्गावरील अतिक्रमणे हटवणे, विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती आणि रथमार्गावरील खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत.