खोटी कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी; डान्सबारवरील आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी डान्सबारच्या मालकीवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईतील कांदिवलीत योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार आहे आणि या बारवर धाड टाकल्यानंतर २२ बारबाला सापडल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता योगश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Narvekar News: महाराष्ट्र विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश बंद; विधानसभा अध्यक्षांची घोषणा
या आरोपांनंतर मंत्री योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी केलेले आरोप खोटे असून त्यामागे राजकीय हेतू आहे, हे आरोप मी पुराव्यानिशी खोडून काढणार आहे. माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आले असून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे माझ्या आईची बदनामी केली जात आहे. योग्य वेळ आल्यावर मी हे सगळं स्पष्ट करून दाखवेन, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अनिल परब यांनी सभागृहात माहिती अधिकारातून मिळवलेली कागदपत्रे सादर केली असून, सावली डान्स बारचे परवाना योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचा पुनरुच्चार केला. वाळू उपसा प्रकरणासह बार परवान्याचे मुद्दे उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्याचबरोबर “तलाठ्याला जो न्याय दिला जातो, तोच न्याय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही द्यावा,” अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.
अनिल परब यांनी पुढे सांगितले की, जिओ-टॅग लावून फोटो घेतले असून, त्यातील अक्षांश-रेखांशासह साक्षेप माहिती सभागृहात मांडण्यात आली आहे. परमिट रूम संदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली असून, यावरून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.
“एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेत असता आणि दुसरीकडे आई-बहिणींना डान्स बारमध्ये नाचवता? यासारखी शरमेची बाब नाही,” अशी तीव्र टीका करत परब यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संबोधित करून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार; अनिल परबांचा सभागृहात खळबळजनक आरोप
जर या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही, तर हे सरकारच या प्रकारांना पाठीशी घालत आहे, हे स्पष्ट होईल, असे वक्तव्य करत परब यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. गृहराज्यमंत्री कायद्याचे पालन करत नसतील, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येते, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली.या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळजनक कलाटणी पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि योगेश कदम यांच्यावरील आरोपांवर येणाऱ्या दिवसांत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.