पारनेरमध्ये राजकीय वातावरण तापले; लंके विरोधक एकवटले, शिवसेना ठरणार किंगमेकर?
नुकतीच राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटप तसेच उमेदवार निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभेच्या अनपेक्षित निकालानंतर महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक वाढली असून आघाडीच्या नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवण्यासाठी अनेक मातब्बरांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. तर काहींनी आपल्या मतदार संघात प्रचारही सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेदेखील वाचा- कल्याण पश्चिम मतदारसंघात 4 लाख 34 हजार 928 मतदार; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
दरम्यान नगर दक्षिण लोकसभा निलेश लंकेंनी जिंकल्यानंतर त्यांची पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. आता याच जागेवरून पारनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी प्रचार केलेले जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव लामखडे, यांच्यासह मागील विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांच्यासोबत असलेले पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे मोठे नेते शिवाजीराव गुजर, सुजित झावरे, काशिनाथ दाते यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पारनेरच्या या दिग्गजांनी एकत्रित येत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का मानला जात आहे.
अशातच पारनेरमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित झाला नसून महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार अद्याप निश्चित नाही. मात्र आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या इच्छुक असल्याचे समजते. परंतु लोकसभेला दिलेल्या शब्दाचा आधार घेत शिवसेना ठाकरे गटाने देखील या जागेवर दावा ठोकला आहे. या जागेसाठी तालुकाध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे हे सध्या तरी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी डॉ. पठारे यांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित केला होता. या मेळाव्यात अंधारे यांनी पारनेरची जागा शिवसेनाच लढवेल असे म्हटले होते. तर पारनेरची जागा शिवसेनेला दिली नाही तर आघाडीला याचा मोठा तोटा सहन करावा लागेल असे यावेळी काही शिवसैनिकांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली होती.
पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभेची परतफेड म्हणून हा मतदार संघ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. ठाकरे गटाकडून श्रीकांत पठारे इच्छुक आहेत. मात्र लंके समर्थकांकडून राणी लंके यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पठारे यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे.
आघाडीत पारनेरची जागा शरद पवार गटाला मिळाल्यास येथील शिवसेना ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत राहील असे चित्र दिसते. तर शिवसेनेला विधानसभेची जागा मिळाली नाही तरी पुन्हा एकदा आघाडीचा धर्म मानून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जाहीर मदत करणार का कि या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेऊन महायुतीच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष मदत करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.