निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने काम करावं; निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांचं आवाहन
कल्याण: निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सहकार्याने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिले आहेत. सार्वत्रिक विधानसभा निवडणूका 2024 ची आदर्श आचारसंहिता भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात नियुक्त नोडल अधिकारी यांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली डोंबिवली येथील वै. ह भ प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कार्यालयात संपन्न झाली, त्यावेळी हे निर्देश देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा- कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त इतका बोनस जाहीर; रविंद्र चव्हाण यांची माहिती
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्र स्विकारली जाणार आहेत. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी छाननी, दिनांक 4 नोव्हेंबर रोजी माघार, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान व दिनांक 23 नोव्हेंबर मतमोजणी असा निवडणूकीचा कार्यक्रम आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने सहा. आयुक्त तथा नोडल अधिकाऱ्यांनी सार्वजनिक मालमत्ता, खाजगी मालमत्ता व शासकीय मालमत्तेवरील पोस्टर्स, बॅनर्स, कट ऑऊटस् इ. त्वरीत काढण्याची कारवाई करावी.
तसेच कोनशिलेवरील राजकीय पदाधिकारी, पक्षाचे नाव असेल तर ते, झाकण्याची कार्यवाही करुन, तसा अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे “सीव्हीजील ॲपवर” प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्याचे निर्देश कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी या बैठकीत दिले.
तसेच झोनल अधिकारी यांच्या समवेत संपन्न झालेल्या बैठकीत आपल्या अखत्यारीतील मतदान केंद्राची पाहणी करुन या मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत याची पुन्हा खातरजमा करुन तसा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिले आहेत.
हेदेखील वाचा- मतदारांनी उस्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा; दापोली उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन
या बैठकीला महापालिकेचे उप आयुक्त प्रसाद बोरकर, सहा.पोलीस आयुक्त (डोंबिवली) सुहास हेमाडे, पोलीस विभागातील इतर वरीष्ठ अधिकारी, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, गट विकास अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी संजय भोये, महापालिकेचे उपअभियंता तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी राजू राठोड, सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत, चंद्रकांत जगताप तसेच इतर समन्वय अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. एकाच टप्प्यात 288 जागांसाठी राज्यात मतदान होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदान केंद्रे आहेत. तर राज्यात एकूण 9 कोटी 3 लाख मतदार आहेत.