कल्याण पश्चिम मतदारसंघात 4 लाख 34 हजार 928 मतदार; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 4 लाख 34 हजार 928 मतदार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी रोहित राजपूत यांनी दिली आहे. कल्याण पश्चिम मतदार संघात लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांच्या नावांचा घोळ झाल्याने गोंधळ उडाला होता. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत पुन्हा मतदार नोंदणी सुरू केली. या नोंदणीवेळी विधानसभा निवडणुकीपर्यंत 35 हजार मतदार वाढल्याची माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
हेदेखील वाचा- महायुतीचे जागावाटप जाहीर का झाले नाही? देवेंद्र फडणवीस स्पष्टचं बोलले…
कल्याण पश्चिम मतदार संघात एकूण 441 मतदान केंद्र आहेत. यामधील शहरी भागात 439, ग्रामीण भागात 3 मतदान केंद्र आहे. मतदारांची मतदान करताना गैरसोय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी 27 पथकं तैनात करण्यात आली असून ते दिवस रात्र काम करणार असल्याची माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकंदरीतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदा शर्तीचे प्रयत्न केले असून मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास देखील यावेळी निवडणुका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाल उपस्थित होते.
हेदेखील वाचा- Maharashtra Election 2024: भाजपचे पहिले १० मतदारसंघ ठरले? ‘या’ २ मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पहा यादी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. एकाच टप्प्यात 288 जागांसाठी राज्यात मतदान पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे आहेत. तसेच राज्यात एकूण 9 कोटी 3 लाख मतदार आहेत, असे देखील निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर 26 नोव्हेंबर आधी राज्यात नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच यंदाची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. या निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदार आणि 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा दिली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांचे दौरे, मेळावे, सभा सुरु आहेत.