'की उकळता लाव्हाच तूं, कोण तूं रे कोण तूं'; राज ठाकरेंनी कवितेतून उलगडले छत्रपती शिवाजी महाराज
संपूर्ण महाराष्ट्रात आज २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात हा कार्यक्रम होत आहे. या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने कवितांची मैफीलही रंगली. यावेळी राज ठाकरे, जावेद अख्तर, अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यांसह अनेक दिग्गज उपस्थित होते. या सर्व दिग्गजांनी विविध कविता सादर केल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम कविता सादर करत या मैफिलीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’मधील एक काव्य सादर केले. ही कविता, याला कविता म्हणायचं, काव्य म्हणायचं; मला कल्पना नाही. आज मी जे काही काव्य निवडलं आहे ते तुम्ही ऐकलं नसेल, असं मला वाटत आहे. जर ऐकलं असेल तर आनंदच आहे. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती यामधील हे काव्य आहे. बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून हे काव्य लिहिलेलं आहे. यात बाबासाहेबांचं म्हणणं ते महाराजांविषयी लिहिताना, त्यांच्याकडे बघताना ते काय समजू आम्ही तुला, कोण आहेस कोण तू. या कवितेचे शीर्षक आहे कोण तू रे कोण तू…., असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
राज ठाकरेंनी म्हटलेली कविता
“कोण तूं रे कोण तूं कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ? जानकीचे अश्रू तूं ? की उकळता लाव्हाच तूं ? खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतील त्वेष तूं ? वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ? भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ? मोहिनीची युक्ती तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ? अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ? कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ? वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद्घोष तूं ? शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ? की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ? शंकराचा नेत्र तूं ? की भैरवाचे अस्त्र तूं ? की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तूं ? कर्मयोगी ज्ञान तूं ? की ज्ञानियांचे ध्यान तूं ? चंडिकेचा क्रोध तूं ? की गौतमाचा बोध तूं ? तापसीचा वेष तूं ? की अग्निचा आवेश तूं ? मयसभेतिल शिल्प तूं ? नवसृष्टिचा संकल्प तूं ? द्रौपदीची हांक तूं ? प्रलंकराचा धाक तूं ? गीतेतला संदेश तूं अन् क्रांतिचा आदेश तूं ! संस्कृतीचा मान तूं अन् आमुचा अभिमान तूं ! कोण तूं रे कोण तूं…….कोण तूं रे कोण तूं !”
मी आज भाषण करणार नाही. गुढीपाडव्याला माझं भाषण आहे. त्यामुळे मला जे काही सांगायचं हे मी ३० तारखेला सांगेनच. आज मराठी भाषा गौरव दिन. सरकारने जाहीर केला होता, पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो. २००८ मध्ये हा दिवस साजरा करायची सुरुवात आपण केली. त्यानंतर सर्वत्र हे कार्यक्रम करण्याची सुरुवात झाली. यावेळी परत कार्यक्रम करायला हवा, असं मला कोणीतरी सांगितलं, त्यामुळे परत हा कार्यक्रम करतो. सर्व लोक इथे फक्त मराठी भाषेच्या प्रेमाखातर इथे आले आहेत. आशाताईंना बरं नसतानाही त्या इथे आल्या आहेत. हे सगळेच सर्वांना माहिती आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटले.
अनेकांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर इथे काय करणार आहेत. भाषा याा विषयावर मी त्यांचं एक भाषण ऐकलं होतं. आपली भाषा टिकवण्यासाठी भाषा किती महत्त्वाची असते, ती कशी टिकवली पाहिजे, कशाप्रकारे टिकवली पाहिजे, यावरचे एक भाषण मी ऐकलं होतं. त्यानंतर मी जावेद साहेबांना विनंती केली होती की सोनाराने जसं कान टोचावे लागतात, आमच्याकडे अटनबरोंनी दाखवल्यानंतरच महात्मा गांधी समजले. नाहीतर आम्हाला महात्मा गांधी माहितीच नव्हते. मराठी भाषा कशी टिकवली पाहिजे, हे जेव्हा जावेद अख्तर यांच्यासारखे दिग्गज व्यक्ती सांगणार आहेत. आशाताईंनी मला म्हटलं की मी इतक्या कविता, गाणी म्हटली आहेत, मग या सर्व गोष्टींमधून एखादी कविता कशी निवडायची. मी त्यांना तुम्ही इकडे या तरी, असे म्हटलं, असेही राज ठाकरेंनी सांगितले.