राज ठाकरेंचा मोठा निर्णय; 'या' बड्या नेत्यांची मनसेतून हकालपट्टी
मुंबई : महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युती होणार अशीही चर्चा सुरु आहे. विविध पक्षातील अनेक नेते पक्षांतर करत असल्याचेही दिसून येत आहेत. मनसेमधीलही काही नेते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. पक्षविरोधी कार्य केल्यामुळे राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने जवळपास वीस वर्षांपासून राज ठाकरे यांना साथ देणारे खंदे समर्थक वैभव खेडेकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे.
मनसे पक्षाच्या या कारवाईबाबत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. हा आदेश जारी करताना सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मनसेने वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्यासोबतच अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे, सुबोध जाधव यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे, असे कारण देण्यात आले आहे.
वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार?
मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे लवकरच राज ठाकरेंची साथ सोडून भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी वैभव खेडेकर दापोलीत महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी वैभव खेडेकर यांना आपल्या पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली होती. यानंतर आता वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून वैभव खेडेकर त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसांपासून कोकणात राज ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत.