मुंबई : नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Corporations Election) मनसे (MNS) आणि शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली आहे. मनसेच्या या नाऱ्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने युतीच्या चर्चा रंगल्या होत्या.
संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार असल्याची माहितीदेखील देशपांडे यांनी दिली.
युती हा जर तरचा विषय असून आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. कार्यकर्त्यांमधे चैतन्य कायम ठेवण्यासाठी पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. यासोबतच, राज ठाकरेंच्या आदेशानुसार तयारीला सुरुवातदेखील केली असल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतात
मनसेचा विदर्भ दौरा हा पक्ष वाढीसाठी आहे. तसेच, दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतात. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो याला फार महत्त्व नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.